मुंबई विद्यापीठाचा सावळागोंधळ; गुणपत्रिकेवर चुकीचा पीआरएन नंबर | पुढारी

मुंबई विद्यापीठाचा सावळागोंधळ; गुणपत्रिकेवर चुकीचा पीआरएन नंबर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  एलएलबी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर सहाच्या निकालात मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणपत्रिकेवर चुकीचा पीआरएन नंबर टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा विभागाचा
सावळागोंधळ समोर आला आहे. तब्बल 3 हजार 64 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.

मुंबई विद्यापीठाकडून एलएलबीच्या सहाव्या सत्राची परीक्षा मे महिन्यामध्ये घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी निकालाची प्रत विद्यार्थ्यांना देण्यात आली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3064 विद्यार्थ्यांच्या निकालावरील पीआरएन नंबर परीक्षा विभागाकडून चुकीचा टाकण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपला एलएलबी प्रवेशावेळी भरलेला अर्जावरील पीआरएन नंबर आणि गुणपत्रिकेवरील पीआरएन नंबर तपासून पाहिला असता तो चुकीचा असल्याचे दिसून आले.

पीआरएन क्रमांक चुकीचे असल्याचे लक्षात येतात विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विद्यापीठाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांकडे धाव घेतली. अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गेले काही दिवस गर्दी करत आहेत.
परीक्षा विभागातील अधिकार्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे हा गोंधळ झाल्याचे लक्षात आले आहे

परीक्षा विभागातील कारभार कसा सुधारणार असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे. अजून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेसाठी 15 दिवस वाया घालयवाचे का? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युवासेना सदस्य
अ‍ॅड. सचिन पवार यांनी उपस्थित केला आहे.

लॉ परीक्षेच्या सत्र 6 च्या गुणपत्रिकेतील पीआरएन व्यतिरिक्त इतर सर्व तपशीलबरोबर आहेत. गुणपत्रिकेवरील 16 अंकी पीआरएन क्रमांकातील 16 वा अंक हा तांत्रिक बाबीमुळे शून्य झाला आहे. तो दुरुस्त करून लवकरच नवीन गुणपत्रिका वितरित केल्या जातील.

Back to top button