राजकारणात कट्टर शत्रुत्व; क्रिकेटमध्ये मात्र मित्रत्व! | पुढारी

राजकारणात कट्टर शत्रुत्व; क्रिकेटमध्ये मात्र मित्रत्व!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात आजघडीला एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले नेते बुधवारी रात्री क्रिकेटसाठी म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी एकत्र आले, एका पंक्तीला बसले आणि काही काळ हास्यविनोदात रंगले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पॅनल जिंकावे म्हणून एकमेकांना सहकार्य मागितले आणि मनसोक्त बॅटिंगही केली. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस गट आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष सुरू असताना राजकारणातील हे विरोधक क्रिकेटच्या निमित्ताने एकत्र आले हाच मोठा चर्चेचा विषय झाला.

गुरुवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होत असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचे पॅनल उतरले आहे. त्यांच्या विरोधात ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पॅनल निवडणूक लढवत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे हे एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पवार-शेलार पॅनलमधूनच रिंगणात असून, त्यांचा सामना संदीप पाटील यांच्याशीच आहे. पवार-शेलार यांच्या या पॅनलसाठीच शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर बुधवारी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गरवारे क्लबला स्नेह भोजनासाठी एकत्र आले. आशिष शेलार आणि शरद पवार यांच्या पॅनलनेच हे स्नेहभोजन आयोजित केले होते. या वेळी सजलेला राजकीय मंच पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरू आहे त्यावर क्षणभर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूलाच शरद पवार तर देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी जितेंद्र आव्हाड बसल्याचे दिसले.

जावयाचे ऐकावे लागेल : पवार

आपले पॅनल एकजुटीने निवडून आणूया, असे आवाहन करत शरद पवारांनी त्यास मिश्किल जोड दिली. ते म्हणाले, शिंदे साहेब तुम्हाला माहित नसेल माझे सासरे सुद्धा शिंदे होते. नुसते शिंदे नव्हते तर कसोटी क्रिकेटपटू होते. त्यामुळे त्यांना माहीत झाले होते की शिंदेच्या मुलीची काळजी पवारच घेऊ शकतात. त्यामुळे शिंदेनी पवार यांना मुलगी दिली. आता मुलीची काळजी म्हणून जावयाच्या काही सूचना ऐकायला लागतील. त्यांचा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. पवार पुढे म्हणाले, राजकारणामध्ये सगळ्यांचे वेगळे विषय असतात मात्र खेळामध्ये आम्ही राजकारण बाजूला ठेवतो. मी जेव्हा बीसीसीआयाचा अध्यक्ष होतो, तेंव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी सुद्धा बैठकीला आले होते. या ठिकाणी राजकीय भुमीका नसते, त्यामुळे शेलार, पवार आणि इतर एकत्र येतात. त्याची वेगळी बातमी करायची गरज नाही.

पवार, शेलार यांना आमची साथ : फडणवीस

तोच धागा पकडून देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता सासरच्या मंडळींना कोण नाही म्हणू शकते? शरद पवार आणि आशीष शेलार यांना एक व्हिजन आहे. त्यामुळे या पॅनलला माझी आणि मुख्यमंत्र्यांची साथ आहे. ही जागा आहे ती वानखेडे यांची आहे. लिज संपली आहे. वानखेडे सुद्धा नागपूरचे होते. शरद पवार यांच्यासोबत मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या लिजला मुदतवाढ द्यावी. वानखेडे स्टेडियमला सुरक्षेपोटी 10 कोटीचे बिल झाले आहे. त्याची वसुली करायला मी कधी आलो नाही. मी आश्वस्त करतो की कायदेशीर कारवाई पूर्ण करून हे बिल रद्द करू, अशी आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Back to top button