ठाकरेंच्या सेनेला भाकपचा ‘लाल’ सलाम; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर | पुढारी

ठाकरेंच्या सेनेला भाकपचा ‘लाल’ सलाम; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षात विविध विचारांच्या राजकीय – सामाजिक संघटनांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे. यात बुधवारी चक्क भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा)ने ठाकरेंच्या शिवसेनेला बुधवारी जाहीर पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांचा संघर्षमय इतिहास बाजूला ठेवत भाजपा विरोधात ‘व्यापक एकजुटी’ची हाक यानिमित्ताने देण्यात आली. थेट ‘मातोश्री’वर जात भाकपा नेत्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंब्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षांच्या सहा दशकांच्या इतिहासात प्रथमच ‘मातोश्री’वर डाव्या विचारांच्या नेत्यांनी ‘लाल सलाम’ केला.

भाकपा आणि डावे पक्ष-संघटनांना तीव्र विरोध करत शिवसेना मुंबईत रुजली आणि पुढे राज्यभर फोफावली. शिवसैनिक आणि डाव्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आजही वेगवेगळ्या प्रसंगी बोलून दाखविला जातो. पण, ‘काळ बदलला’, त्यानुसार दोन्ही बाजूच्या भूमिकांमध्येही बदल झाला आहे. भाजपाच्या हुकूमशाही विरोधात, मनुवादी आणि लोकशाहीविरोधी धोरणांना रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या व्यापक एकजुटीची आवश्यकता आहे, असे सांगत भाकपाने अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला.

मुंबई आणि महाराष्ट्रातील या बदलत्या राजकीय समीकरणाबद्दल ‘पुढारी’ला माहिती देताना प्रकाश रेड्डी म्हणाले की, लोकशाही संस्था बेचिराख करणार्‍या भाजपाला रोखणे, ही आमची मुख्य भूमिका आहे. प्रादेशिक पक्ष संपवत एकाधिकारशाही आणायची, हे भाजपाने स्पष्ट सांगितले आहे. तर, भारतात प्रादेशिक पक्ष राहिले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. त्यामुळे देशात प्रत्येक ठिकाणी भाजपाविरोधात व्यापक एकजुटीची आम्ही हाक दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाला रोखण्यासाठी अंधेरी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव करणे आवश्यक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. शिवसेना आणि डाव्या कार्यकर्त्यांच्या भूतकाळातील संघर्षाबाबत रेड्डी म्हणाले की, शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा तो काळ मी पाहिला आहे. पण, आताची शिवसेना ही व्यापक भूमिका घेत आहे. त्यांनी महाराष्ट्र हिताची भूमिका घ्यावी, आपल्या कार्यक्रमातून प्रबोधनकारांची परंपरा चालवावी. पुढील काळासाठी ते आवश्यक आहे. इतिहास काही असला तरी काळ बदलला आहे, त्यामुळे जुन्या भूमिकेऐवजी नवी एकजूट होत आहे. डबेवाल्यांचा ठाकरे यांना पाठिंबा आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. त्यानंतर आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे सांगत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर आणि सहकार्‍यांनी पाठिंबा जाहीर केला. हाती धगधगती मशाल घेऊनच हे डबेवाले मातोश्री निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे आणि आदेश बांदेकर उपस्थित होते.

तुषार गांधीदेखील मातोश्रीवर महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी आणि फिरोज मिठीबोरवाला यांनी बुधवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानात शिवसेनेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी ही भेट होती. या अभियानात देशभरातील इतर आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे. आपली लोकशाही आणि देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून नफरत छोडो संविधान बचाव अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचे आवाहनही आम्ही केले. तसेच, ठाकरे यांना आमचा पाठिंबा दर्शवल्याचीही माहिती तुषार गांधी यांनी दिली.

Back to top button