दिवाळीनंतर कांदा रडवणार; दरात वाढ होण्याचे संकेत | पुढारी

दिवाळीनंतर कांदा रडवणार; दरात वाढ होण्याचे संकेत

नवी मुंबई; पुढारी वार्ताहर : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर असले तरी वाढत्या मागणीमुळे महिनाभरात कांदा दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर 35 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या घाऊक बाजारात 10 ते 14 रुपये किलो व किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार 20 ते 30 रुपये किलोदरम्यान आहेत.

मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याला फटका बसला आहे. तर जुना कांदा भिजल्याने खराब झाला आहे. महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी असते. कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्नाटक हुबळी येथील नवीन कांद्याची आवक थांबली आहे. तसेच जुना कांदा खराब होत असून नवीन कांदा उत्पादनाला एक ते दीड महिना विलंब आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे पीक नोव्हेंबपर्यंत येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यात कांद्याची लागवड चांगली होते. मात्र, प्रतवारीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील कांद्याचा दर्जा परराज्यातील कांद्याच्या तुलनेत चांगला असतो. दसरा-दिवाळी या कालावधीत कांद्याला मागणी वाढते. महिनाभरात परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात जुना कांदा दाखल होत असला तरी त्यामध्येही 80 टक्के कांदा हलक्या दर्जाचा तर 20 टक्के कांदा उत्तम दर्जाचा येत आहे. अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे, असे व्यापार्‍यांनी स्पष्ट केले. सध्या बाजारात पुणे, नाशिक आणि नगर येथून कांदा बाजारामध्ये येत आहे. जर मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास ही आवकही घटू शकते, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

कोथिंबीर शंभरी पार

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोथिंबीरचे पीक पाण्याखाली गेल्याने जेमतेम शिल्लक असलेला कोथिंबीर शेतमाल शेतकर्‍यांच्या हाती लागला आहे. कोथिंबिरीच्या उत्पादनात घट झाली असून त्याचा परिणाम मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात दिसून येत आहे. सोमवारी कोथिंबीरची एक जुडी 80 रुपये झाली. हीच जुडी किरकोळ बाजारात 120 रुपयांना मिळत होती. मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून कोथिंबीरची आवक होते. मात्र सद्यस्थितीत केवळ नाशिकमधून कोथिंबीर बाजारात येत आहे. नाशकात अतिवृष्टीमुळे भाजीपालासह इतर शेतमाल पाण्याखाली गेल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कोथिंबीर, जीपाला सडून गेल्याने बांधावरच फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आल्याची माहिती घाऊक व्यापार्‍यांनी दिली.

Back to top button