महामंडळ नियुक्त्या कधी होणार मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा | पुढारी

महामंडळ नियुक्त्या कधी होणार मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : विविध महामंडळांवरील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून,
बहुतांश नियुक्त्या येत्या 15 दिवसांत झालेल्या दिसतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी
(दि.4) येथे सांगितले.

विधान परिषदेवरील नियुक्‍तीच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चाळीसगाव, कन्नड तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विधान परिषदेवरील नियुक्त्यांसाठी राज्यपालांना सादर केलेल्या यादीतून नाव वगळण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला जाईल, या राजू शेट्टी यांच्या वक्‍तव्याकडे लक्ष वेधले असता, विधान परिषदेवरील नियुक्‍तीला आपण फारसे महत्त्व देत नसल्याचे वक्‍तव्य शेट्टी यांनीच यापूर्वी केले होते.

आम्ही त्यांचे नाव वगळले किंवा त्यांच्या नावाला कात्री लावली असे म्हणणे निरर्थक आहे, असेही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवरच निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित सरकार स्थापन केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रितच लढवाव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर नेत्यांना देण्यात आले आहेत. सामोपचाराने हा प्रश्न सुटला तर आनंदच होईल. मात्र, स्थानिक पातळीवरच याबाबत निर्णय घेतले जातील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘संभाजीनगर’चा विषय गांभीर्याने घेऊ नका

औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ असे यापूर्वीच झाल्याचे वक्‍तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.

या विषयी विचारणा केली असता, महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही.

‘संभाजीनगर’वर शिवसेना ठाम असली तरी निवडणूक जशा जवळ येतात तसे ठामपणा बदलत जातो. त्यामुळे देसाई यांचे वक्‍तव्य तूर्त गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Back to top button