सांगली : मनपा स्थायी सभापती निवडणूक : काँग्रेसला झटका; भाजपचे 9 सदस्य सहलीवर | पुढारी

सांगली : मनपा स्थायी सभापती निवडणूक : काँग्रेसला झटका; भाजपचे 9 सदस्य सहलीवर

सांगली : पुढारी वृत्तसेवा  महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी काँग्रेसने भाजपच्या काही नगरसेवकांभोवती गळ टाकले होते. त्याची कुणकुण लागताच गुरुवारी रात्रीच भाजपचे नेते सतर्क झाले. स्थायी समितीतील भाजपच्या सर्व 9 नगरसेवकांना एकत्र केले आणि शुक्रवारी दुपारी सहलीवर पाठवले. त्यामुळे फोडाफोडीच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना ‘जोर का झटका’ बसला आहे, तरीही काँग्रेसच्या आशा कायम आहेत.

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (दि. 9) निवडणूक होत आहे. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे 9, काँग्रेसचे 4 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. भाजपमध्ये सभापतिपदासाठी मोठी रस्सीखेच आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. राष्ट्रवादीने महापौर निवडणुकीत चमत्कार घडवून आणला होता. राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसने स्थायी समिती बळकावण्यासाठी भाजपमध्ये फोडाफोडी करण्याचे प्रयत्न सुरू होते.

‘स्थायी’सारखी महत्वाची समितीही खेचून घेण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू झाल्या होत्या. त्यामुळे भाजपचे नेते दक्ष झाले होते. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार तसेच मदनभाऊ गटाचे कट्टर समर्थक फिरोज पठाण हे सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी आपआपल्या पद्धतीने बहुमताच्या जुळणीसाठी प्रयत्न सुरू केले होते.

सांगली व मिरजेतून काँग्रेस इच्छुकांच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. भाजपच्या काही नगरसेवकांना ऑफर दिली होती. ‘टोकण’ दिल्याची चर्चाही रंगली होती. गुरूवारी रात्री दोन वाजेपर्यंत फोनाफोनी, बैठका आणि चर्चांना उत आला होता. भाजपचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, कल्पना कोळेकर व आणखी एका नगरसेवकाशी काँग्रेसकडून संपर्क साधला जात होता. मात्र ठोकळे, कोळेकर यांनी काँग्रेसची मोठी ऑफर नाकारून भाजपसोबतच राहणार असल्याचा ठाम पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. एकूणच काँग्रेसच्या हालचालींची कुणकुण भाजपला लागली आणि रात्रीत भाजपने सावध पावले टाकण्यास सुरूवात केली.

भाजपने स्थायी समितीतील सर्व 9 सदस्यांना एकत्र केले आणि शुक्रवारी दुपारी वाहने सांगलीतून पुर्वेच्या दिशेने धावू लागली. तुळजापूरमार्गे हैद्राबाद सहलीवर भाजपचे स्थायी समितीचे नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवले. भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक धीरज सूर्यवंशी व त्यांचा फौजफाटा या नगरसेवकांसोबत आहे.

भाजपचे 9 स्थायी समितीतील सर्व 9 सदस्य सहलीवर गेल्याचे समजताच काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली. फोडाफोडीच्या प्रयत्नांना झटका बसला आहे. तरिही काँग्रेसकडून शेवटपर्यंत बहुमताच्या जुळणीचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 3 असे 7 संख्याबळ आहे. बहुमतासाठी आणखी 2 सदस्यांची गरज आहे.

सभापतिपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

स्थायी समितीत भाजपचे 9 सदस्य आहेत. त्यापैकी माजी सभापती पांडुरंग कोरे यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व 8 नगरसेवक सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. निरंजन आवटी, सविता मदने आणि संजय यमगर यांच्यातच खरी रस्सीखेच असल्याचे सूत्रांनी सांगितले. गजानन आलदर, जगन्‍नाथ ठोकळे, सुनंदा राऊत हे सदस्यही सभापतिपदाच्या शर्यतीत आहेत. भाजपमधील संभाव्य नाराजीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची समीकरणे अवलंबून आहेत.

Back to top button