जयंत पाटील राजू शेट्टी यांच्या आमदारकीबाबत म्हणाले... | पुढारी

जयंत पाटील राजू शेट्टी यांच्या आमदारकीबाबत म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आमदारकी नाकारल्याचे वृत्त जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फेटाळले आहे. तर ‘माझा करेक्ट कार्यक्रम केला असेल तर त्याही पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करून दाखवतो,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

१२ राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीवर सही करण्यास राज्यपाल कोश्यारी मुद्दाम उशिर लावत आहेत, असा आरोप महाविकास आघाडी करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेऊन आमदार नियुक्ती करण्याची विनंती केली.

मात्र, या यादीतील काही नावांवर आक्षेप घेतला. या यादीतील राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीने करेक्ट कार्यक्रम केला असा मेसेज बाहेर दिल्यानंतर करेक्ट कार्यक्रमाच्याही पुढे करेक्ट कार्यक्रम असतो, असे सांगत शेट्टी यांनी इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझोता होता.

तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे.

आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो.

त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असे काही टोकाचे नाही.

गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही,’ असेही ते म्हणाले.

‘असे काही झालेले नाही….’

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही, असा खुलासा राजू शेट्टी यांच्याबाबत जयंत पाटील यांनी केला आहे.

ते म्हणाले,‘आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत,

असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला त्याच्यावरचा निर्णय येत नाही.’

हेही वाचा: 

Back to top button