पूरग्रस्त लोकांच्या मदतीबाबत पवारांनी बोलावे : राजू शेट्टी | पुढारी

पूरग्रस्त लोकांच्या मदतीबाबत पवारांनी बोलावे : राजू शेट्टी

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारकडे मंत्र्यांना बंगले व गाड्या घ्यायला पैसे आहेत, तर केंद्र सरकारलाही केवळ गुजरातची संकटे दिसतात; मात्र या दोघांनाही महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि पूरग्रस्तांचे दुखणे दिसत नाही, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला. राजू शेट्टींना आमदारकी मिळणार, नाही मिळणार यापेक्षा पूरग्रस्तांना वेळेवर मदत देणार काय, त्यांचे प्रश्न संपवणार काय यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाष्य करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्य शासनाकडून पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, कारखानदार यांना एका पैशाचीही मदत मिळालेली नाही. शासनाच्या या दुर्लक्षपणाच्या निषेधार्थ शेट्टी यांनी आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची ही सुरू केलेली पदयात्रा शनिवारी इचलकरंजीत आली. येथील तीनबत्ती चाररस्ता चौकात पदयात्रा फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करत शेट्टी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा संभाजी चौक, चांदणी चौक, गुजरी पेठ मार्गे गावभागातील मख्तुम दर्गा परिसरात आली. येथे जाहीर सभा झाली.

शेट्टी म्हणाले, महापुरात मोठं नुकसान झाले. घरे बुडालेल्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिला आहे की, जुनी घरे आम्हाला द्या, नवीन घरासाठी आम्ही जागा देतो, असे सांगत आहेत. त्यांनी हा नवीन धंदा सुरू केला आहे का? अगोदरच तुमचे अनेक धंदे आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जुनी जागा तुम्हाला देणार नाही. पुनर्वसन करणं सरकारचे कर्तव्य आहे.

इचलकरंजीतील मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग पाण्याखाली बुडाला; पण पंचनामे करायला अधिकारी तयार नाहीत. या सरकारला सध्या पूरग्रस्तांना वार्‍यावर सोडायचे आहे; पण हे तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक राजवर्धन नाईक, कामगार नेते सदा मलाबादे, इचलकरंजी स्वाभिमानीचे शहराध्यक्ष रामदास कोळी, गोवर्धन दबडे, अण्णासाहेब शहापुरे, बसगोंडा पाटील, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आदी पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेनंतर पदयात्रा अब्दुललाटकडे रवाना झाली.

दरम्यान, रात्री उशिरा अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे सभा झाली. यावेळी राजू शेट्टी, जालंदर पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी राजू नाईक, सुमतीनाथ शेट्टी, शीतल कुरणे, सावकार मादनाईक, सागर शंभुशेट्टी, प्रकाश बालवडकर यांच्यासह भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निबांळकर, जि.प. सदस्य विजय भोजे आदी उपस्थित होते.

इचलकरंजीला पाणी मीच देणार : शेट्टी

काही लोकांनी मी इचलकरंजीला पाणी देणार नाही, अशी दिशाभूल करून मी पाण्याच्या प्रश्नामध्ये आडवा येतोय म्हणून माझ्याबाबत लोकांचे मन कलुषित केले. त्याच इचलकरंजीत आज मेघराजाने माझं स्वागत केले. गेल्या दीड वर्षात कुठं आलं पाणी? इचलकरंजीच्या जनतेला मिळाले काय पाणी? एक दिवस इचलकरंजीतील पाण्यासाठी मीच संघर्ष करणार आहे. फक्त लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ द्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

Back to top button