आता मुंबईतील जलस्रोतांचा अभ्यास! सल्लागारांवर पालिका 90 लाख रुपये खर्च करणार | पुढारी

आता मुंबईतील जलस्रोतांचा अभ्यास! सल्लागारांवर पालिका 90 लाख रुपये खर्च करणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेने शहरातील जलस्त्रोतांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासातून समुद्र, खाड्या, नाले आणि नैसर्गिक जलस्त्रोतांमधील जलप्रदूषणाची तीव्रता आणि पाण्याची गुणवत्ता पालिकेला समजून घेता येणार आहे. या अभ्यासासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी पालिका 90 लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबई शहराला दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यापैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी सांडपाणी म्हणून समुद्र, खाडी, नाले व नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे या जलस्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. मुंबईतील सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी दादर, वरळी, गिरगावसह अन्य ठिकाणी पातमुख (आऊटलेट) बांधण्यात आले आहेत. सध्या येथे प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया करून हे सांडपाणी समुद्रात सोडले जात आहे. मुंबईतील जलप्रदूषणाबाबत केंद्रीय पर्यावरण विभाग, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरीत लवादाने पालिकेला वेळोवेळी नैसर्गिक स्तोत्र असलेल्या जलामध्ये होणार्‍या प्रदूषणाबाबत अवगत केले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने जल प्रदूषणाचा विषय गांभीर्याने घेतला आहे.

शहरात मिठीसह ओशिवरा, पोईसर, दहिसर अशा मोठ्या नद्या आहेत. पूर्वी या नद्यांचा पाणी वापरले जात होते. मात्र सध्या या नद्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे या नद्यांमधील पाण्याचा अभ्यास केला जाणार आहे. येत्या काळात मुंबईत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप आणि मालाड या सात ठिकाणी प्रकल्प सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यातून दररोज सुमारे 2464 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई वापरण्याजोगी अनेक जल स्तोत्र निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पाण्यातील विषारी घटक, मासे, वनस्पती व इतर जैवविविधतेवर होणारे परिणाम याचा या निमित्ताने शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात येणार असल्याचेही पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Back to top button