…तर शरद पवारांची जाहीर माफी मागतो : दीपक केसरकर | पुढारी

...तर शरद पवारांची जाहीर माफी मागतो : दीपक केसरकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. तरी काही गैरसमज झाले असतील, तर मी त्यांच्या घरी जाऊन जाहीर माफी मागण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले.

ज्या – ज्यावेळी शिवसेना फुटली. त्या त्यावेळी शरद पवारांचा हात होता, अशी टीका केसरकर यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केसरकर यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर आता केसरकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, शरद पवार देशाचे नेते आहेत. ते माझ्या गुरूसमान आहेत. त्यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. त्यांची जाहीर माफी मागतो. फारच काही गैरसमज झाले असतील तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची जाहीर माफी मागतो, असे सांगून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

निलेश राणे यांनी केसरकर यांच्याबद्दल केलेल्या ट्विटला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री नाराय़ण राणे आपल्या मुलांची काळजी घेतील. नारायण राणे यांच्याशी माझे वैयक्तिक वैर नाही. सिंधुदुर्गच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास मी तयार आहे. कोणत्याही मुद्द्यावर राणे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठीच काम करेन,असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button