लोकलमध्ये महिलांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही | पुढारी

लोकलमध्ये महिलांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोकल प्रवासादरम्यान महिलांवर होणार्‍या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 323 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पुढील एका वर्षात सर्वच महिला डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
उपनगरीय लोकलमधून सुमारे 20 ते 25 लाख महिला प्रवासी करतात. महिला पहाटे आणि रात्रीच्या वेळी देखील प्रवास करतात. अनेकदा प्रवास करताना एकट्या असलेल्या महिलेवर गर्दुल्ले, मोबाईल चोर हल्ले करतात. तसेच बर्‍याचदा छेडछाड,विनयभंगासारख्या घटना देखील घडतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला होता.

सर्वात आधी पश्चिम रेल्वेने 2015 साली महिलांच्या डब्यांत कॅमेरे लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्य रेल्वेनेही हा प्रकल्प राबविला. बारा डब्यांच्या एका लोकलमध्ये महिलांसाठी सेकण्ड क्लासचे तीन आणि फस्ट क्लासचे तीन छोटे डबे असतात. यातील प्रत्येक डब्यात एक ते दोन कॅमेरे बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील 156 लोकलच्या महिला डब्यांत एकूण 744 सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 183 महिला डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात 589 महिला डब्यांत कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. तर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील सुमारे 41 लोकलमधील 140 महिला डब्यांत कॅमेरे बसविले असून येत्या वर्षभरात उर्वरित लोकलमधील महिलांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

51 लोकलमधील 327 महिलांच्या डब्यात ‘टॉक बॅक’ यंत्रणा

आपातकालीन परिस्थितीत महिलांना गार्ड आणि मोटरमनशी संपर्क साधता यावा याकरिता महिलांच्या डब्यात टॉक बॅक यंत्रणा लावण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरील 40 लोकलमधील 240 डब्यात तर पश्चिम रेल्वेवरील 11 लोकलमधील 87 डब्यांत ही यंत्रणा लावली आहे. दोन वर्षांत सर्व लोकलमध्ये ही यंत्रणा असेल.

टॉकबॅककडे दुर्लक्ष,गैरवापर

लोकलच्या सर्वच महिलांच्या डब्यात टॉकबॅक यंत्रणा लावलेली नाही. त्यामुळे अनेक महिला प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे ते कसे वापरायचे याची कल्पना नसल्याने प्रवासी ममता नार्वेकर यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी दरम्यान दोन वेळा टॉक बॅक यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच टॉक बॅकवरुन डब्यात आलेले अनधिकृत फेरिवाले, तृतीय पंथीय, वेडसर व्यक्ती डब्यात चढल्यास महिला गार्डशी संपर्क साधतात.

Back to top button