फ्लॅटच्या आमिषाने वकील महिलेला 72 लाखांचा गंडा | पुढारी

फ्लॅटच्या आमिषाने वकील महिलेला 72 लाखांचा गंडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका कर्मचार्‍याच्या वकिल पत्नीची फ्लॅटच्या आमिषाने सुमारे 72 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन बिल्डरसह चौघांविरुद्ध एमएचबी कॉलनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

52 वर्षांची तक्रारदार महिला बोरिवली परिसरात राहत असून त्या व्यवसायाने वकिल आहेत. गेल्या 28 वर्षांपासून त्या मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करते, त्यांचे पती मुंबई पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. भाड्याच्या रुममध्ये राहत असल्याने त्यांना स्वतःचा फ्लॅट खरेदी करायचा होता. डिसेंबर 2014 रोजी त्यांना त्यांच्या परिचित इस्टेट एजंटकडून बोरिवलीतील लिंक रोड, एक्सर व्हिलेजमध्ये व्यवसायाने बिल्डर असलेल्या रॉबर्ट मॅथ्यू डिसोझा, सेंन्टन रॉबर्ट डिसोझा, व्हिक्टर लोबोसह अन्य एक भागीदार असलेल्या पिटारीसा रियल्टर्स कंपनीकडून एका इमारतीचे बांधकाम सुरू  असल्याचे समजले.

तिथे पंधरा मजल्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीमध्ये तीन विंग होत्या, तर पहिला ते चौथा  मजल्यापर्यंत पार्किंग होते. हा प्रोजेक्ट आवडल्याने त्यांनी कंपनीच्या बिल्डरची भेट घेऊन या प्रोजेक्टच्या ए विंगच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1303 हा रुम बुक केला होता. त्यासाठी त्यांनी फ्लॅटची संपूर्ण रकमेसह कार पार्किंग, सेवा आणि  रजिस्ट्रेशन असे सुमारे 80 लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम जमा झाल्यानंतर त्यांच्यात तसा करार होऊन त्यांचे बोरिवलीतील रजिस्ट्रेशन कार्यालयात कायदेशीर रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. यावेळी डिसेंबर 2018 पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र 2009 साली सुरु झालेल्या इमारतीच्या बांधकामापैकी मे 2021 पर्यंत फक्त ए विंगचे बहुतांश पूर्ण झाले होते.

बी आणि सी विंगचे पाचव्या मजल्यापर्यंत बांधकाम  झाले होते. नंतर ते प्रोजेक्ट बंद पडल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना अन्य फ्लॅटधारकाने या चौघांविरुद्ध बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात धनादेश न वटल्याबाबत एक दावा केला होता. अन्य एका व्यक्तीने त्यांच्या प्रोजेक्टमध्ये सहा फ्लॅट बुक केले होते. मात्र वन प्लस सेव्हन मजल्याची मनपाने परवानगी देऊनही त्याने अतिरिक्त मजले बांधले होते. अशा प्रकारे कायदेशीर मान्यता नसताना या व्यक्तीशी सहा फ्लॅटचा खरेदी-विक्री केला होता. तसेच तक्रारदार महिलेने फ्लॅट खरेदीसाठी त्यांनी चौघांना 72 लाख रुपये दिले होते, मात्र कंपनीने पुर्नरचनेच्या करारात त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख दिसून आला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर रॉबर्टने तुमचा त्याच्याशी  काहीही संबंध येत नसल्यचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारे रॉबर्ट, सेन्टन, व्हिक्टरसह अन्य एका भागीदाराने त्यांना दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटसाठी दिलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली होती. या चौघांनी अशाच प्रकारे इतर काही फ्लॅटधारकाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तिने शुक्रवारी 17 जूनला या चौघांविरुद्ध एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार नोंदवली आहे.

Back to top button