म्हाडा वसाहतीतील इमारतीं परस्पर वादाच्या भोव-यात | पुढारी

म्हाडा वसाहतीतील इमारतीं परस्पर वादाच्या भोव-यात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  एकल इमारतींना पुनर्विकास करण्यास गृहनिर्माण विभागाने बंदी घातल्यानंतर आता म्हाडा वसाहतीतील इमारतींमध्ये परस्परात वाद निर्माण होऊ लागले आहेत. समूह विकासात शेजारची इमारत नकार देत असल्याने त्या इमारतीविरोधात म्हाडाकडे तक्रारी केल्या जात आहेत.

म्हाडा वसाहतीतील एकल इमारतींना पुनर्विकास करण्यास बंदी आल्यानंतर पेच निर्माण झाला आहे.विशेष बाब म्हणून अर्ज केल्यास त्या इमारतीच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो,असा पर्याय सरकारने ठेवला आहे.इमारतीने तसा प्रस्ताव म्हाडाकडे पाठवाव,म्हाडा तो सरकारकडे पाठवेल,त्यानंतर सरकार निर्णय घेईल,अशी तरतूद आहे. मात्र आपल्या एकल प्रस्तावावर निर्णय होईल की नाही याविषयी सोसायटीसदस्य साशंक आहेत.

काही सोसायट्या आजूबाजूच्या काही  सोसायट्यांना एकत्र घेऊन पुनर्विकास करता येईल का याची चाचपणी करत आहेत.परंतु त्यातही एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. काही सोसायट्यांमध्ये अमुक एक विकासक नेमण्याबाबत मतभिन्नता आहे. काहींना त्यांनी सुचवलेलाच विकासक हवा आहे,काहींना अमुक एवढेच क्षेत्रफळ हवे आहे,असे त्रांगडे आहे. विक्रोळी कन्नमवार नगर येथील सोसायट्यांमध्ये असे मतभेद दिसून आले आहेत. तेथील एका सोसायटीने समूह पुनर्विकासासाठी शेजारील सोसायटीकडे प्रस्ताव ठेवला होता.मात्र त्या सोसायटीने तो अमान्य केला.

तुम्ही प्रस्ताव नाकारल्याने आमचा पुनर्विकास रखडू शकतो,असा आक्षेप घेत प्रस्ताव नाकारणार्‍या सोसायटीची म्हाडाकडे तक्रार करू,असा पवित्रा पहिल्या सोसायटीने घेतला आहे. सोसायट्या एकत्र येत नसतील तर पुनर्विकास होणार कसा,असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. आता एकल सोसायट्यानी आमच्या इमारतीचा समूह पुनर्विकास अशक्य आहे, त्यामुळे आम्हाला एकल पुनर्विकास करू द्यावा,असा प्रस्ताव सरकारकडे पाठवून सरकार काय भूमिका घेते,याची वाट पाहणे एवढेच हाती उरले आहे. कन्नमवार नगरातील काही इमारती खरोखरच एकल आहेत.त्यांच्या आसपास जवळ अंतरावर दुसरी इमारत नाही. त्यामुळे या इमारतींचा समूह पुनर्विकास होणे अशक्य आहे.

Back to top button