

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे ? असा सवाल करत अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ आहे. नोकरी चालकाची पण नाव अग्निवीर, असे म्हणत आता भाडोत्री राजकारण्यांसाठी टेंडर काढा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला. अग्निपथ योजनेवरून कुणी तरुणांची माथी भडकवली. तरुणावर ही वेळ का ? व कोणामुळे आली ? उद्या तरुण अंगावर आले, तर झेलणार कोण ? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
(Uddhav Thackeray) शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज (दि.१९) मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणूक आणि केंद्र सरकारने लष्करातील सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवर भाष्य केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्तेचा माज चालत नाही, हे उद्याच्या निवडणुकीतून दाखवून देऊ, असा इशारा भाजपचे नाव न घेता लगावला. यापुढे कणखरपणे विरोधकांना उत्तर दिले जाईल. ५६ वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले. त्यामुळे शिवसेना मजबूतपणे उभी राहिली आहे. पक्षासाठी अंगावर वार झेलणाऱ्यांना अभिवादन करून शिवसैनिकांच्या संघर्षामुळेच शिवसेना उभी राहिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. स्वप्न साकारण्यासाठी झटणे म्हणजे शिवसैनिक असे सांगून त्यांनी यावेळी पहिल्या फळीतील दिवाकर रावते, सुभाष देसाई, यांचा आवर्जुन उल्लेख केला.
शिवसेनेसाठी दोन्ही उमेदवारांनी मोठी भूमिका निभावली आहे. त्यांचे पक्षाचे काम चांगले आहे, असे सांगून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना डोळे झाकून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिलेली नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले. मत म्हणजे फक्त शिक्का नाही, तर आयुष्य असते. एकही शिवसैनिक गद्दार नाही. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नाही, असे सांगून राज्यसभेत कुणी काही कलाकाऱ्या केल्या आहेत, ते कळलेले आहे, असे सूचक विधान करून दगाबाजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला.
हेही वाचलंत का ?