संजय राऊत म्हणाले, ‘आमची बादशाही खानदानी, तुमचा घमंड चार दिवसांचा’ | पुढारी

संजय राऊत म्हणाले, ‘आमची बादशाही खानदानी, तुमचा घमंड चार दिवसांचा’

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. पंचतारांकित नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या आमदारांच्या समोर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाषण करत वर्धापन दिन साजरा केला. यावेळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करून विरोधी पक्ष भाजवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

राऊत म्हणाले की, 56 वर्षानंतरही न्यायाच्या लढ्यात, सत्याच्या लढाईत कुणी पुढे असेल तर फक्त शिवसेना आहे. शिवसेनेच्या अंगावर राणा बाना काना, असे बरेच किरकोळ लोकं सोडले. पण शिवसेनेचा राष्ट्रीय बाणा हा सर्वांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर टीका करत राऊत यांनी, अग्नीवीर… सैन्यात आता कंत्राटी पद्धतीवर भरती राबवणार… चार वर्षाचं कंत्राट… जगाच्या पाठीवर असा मुर्ख आणि तुघलकी निर्णय कुणीही घेतला नसेल. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैनिक नाही. संपूर्ण देशात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्र शांत आहे पण तो खदखदतोय, असा इशारा त्यांनी दिला.

राजकारणात काही लोकांना फार घमेंड आली आहे. राज्यसभेचा निकाल सर्वांना माहिती आहे. पण एखादी जागा इकडे तिकडे होत असते. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले असे होत नाही. या राज्याची सूत्रे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार, असा विश्वास व्यक्त करत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावत तेरा घमंड तो चार दिनका है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है. ती राहणार. या बादशाहीला नख लावयची हिंमत कुणात नाही, असा गंभीर इशारा दिला.

आज फादर्स डे आहे. फादर ऑफ नेशन असा उल्लेख यायचा तेव्हा बाळासाहेब म्हणायचे की देशाला बाप नाही. पण आज मी सांगू शकतो की बाळासाहेब हे फादर ऑफ हिंदुत्व आहेत. ज्याच्या मनात हिंदुत्व आहे. रोमारोमात हिंदुत्व आहे. तो प्रत्येकजण बाळासाहेबांना बाप मानतो. आणि बाप एकच असतो.

56 वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेस बाळासाहेबांवर प्रांतीयवादी असा शिक्का मारण्यात आला. तसेच 3 महिन्यात हा पक्ष संपेल असे बोलण्यात आले. परंतु बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची मुहूर्तमेढ रोवल्यामुळे देशभरात प्रत्येक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. हे सर्व प्रादेशिक पक्ष भूमिपुत्रांची भूमिका घेऊनच उभे राहिले. आणि आज सुद्धा हा देश प्रादेशिक पक्षांच्या करंगळी वर उभा आहे. कोणताच राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मदतीशिवाय राजकारण करू शकत नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Back to top button