Agnipath Protest : सिंकदराबाद हिंसाचार प्रकरणी माजी सैनिकाला अटक | पुढारी

Agnipath Protest : सिंकदराबाद हिंसाचार प्रकरणी माजी सैनिकाला अटक

सिकंदराबाद: पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या लष्करातील अग्निपथ भरती योजनेविरोधात सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर शुक्रवारी हिंसाचार (Agnipath Protest) झाला होता. आंदोलकांनी अनेक गाड्या जाळल्या होत्या. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. या हिंसाचाराप्रकरणी एका माजी सैनिकाला अटक करण्यात आली आहे. अवुला सुब्बाराव असे अटक केलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. त्‍याने  जमाव जमवण्यासाठी व्हॉट्स ॲपव ग्रुप तयार केला होता. सिकंदराबादमध्ये जाळपोळ आणि तोडफोड करण्यात त्यांचा हात होता, असे स्‍थानिक पाेलिसांनी म्‍हटलं आहे.

(Agnipath Protest) सुब्बाराव हे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी प्रशिक्षण अकादमी चालवत आहेत. या अकादमीच्या नरसरावपेट, हैदराबाद आदीसह ७ ठिकाणी शाखा आहेत. दरम्यान, या हिंसक निदर्शनात वारंगलचा १९ वर्षीय राजेश हा तरुण ठार झाला होता. तर १० ते १२ जण जखमी झाले होते. शुक्रवारी हजारो आंदोलक रेल्वे स्थानकावर जमले आणि त्यांनी तीन प्रवासी गाड्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने रेल्वेचे डबे जाळले आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली होती.

राज्यभरातून हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलात अल्प-मुदतीच्या करारावर सैनिकांची भरती करण्यासाठी सरकारने मंगळवारी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये आंदोलने  केली जात आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button