एकही शिवसैनिक गद्दार नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चिंता नाही : उद्धव ठाकरे | पुढारी

एकही शिवसैनिक गद्दार नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चिंता नाही : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पहिल्यापेक्षा मजबुतीने उभी आहे. राज्यसभेत शिवसेनेचे एकही मत फुटलेले नाही. एकही शिवसैनिक गद्दार नाही. त्यामुळे उद्या हाेणार्‍या विधान परिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नाही, असे सांगून राज्यसभेत कुणी कलाकाऱ्या केल्या आहेत, ते कळलेले आहे, असे सूचक विधान करून दगाबाजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. आमदारांना हॉटेलात ठेवणं हिच आजची लोकशाही आहे, अशीही प्रतिक्रिया ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.

शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज (दि.१९) साजरा होत आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये तळ ठोकून आहेत. याच ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विधान परिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेने एक टीझर प्रसिध्द केला आहे. या टीझरमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत. यात हिंदुत्व आणि भगव्याचं राजकारण यावर भाष्य करण्यात आले आहे. पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button