ठाणे : चार महापालिकांवर महिलाराज | पुढारी

ठाणे : चार महापालिकांवर महिलाराज

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. कल्याण डोंबिवलीतील 133 पैकी 67 वार्ड, उल्हासनगर महापालिकेतील 89 पैकी 45 प्रभाग आणि ठाण्यातील 141 जागांपैकी 71 जागा ह्या महिलांसाठी राखीव झाल्याने या तिन्ही महापालिकांवर महिला नगरसेविकांची संख्या जास्त निवडून येणार असल्याने सर्वत्र महिला राज पाहायला मिळेल.

या आरक्षणामुळे काही प्रस्थापितांना धक्के बसले असले तरी पॅनल पद्धत असल्याने प्रस्थापितांना अन्य ठिकाणी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होऊ घातलेल्या कल्याण महापालिका तसेच उल्हासनगरमधील छोट्या पक्षांच्या उमेदवारांना महिला आरक्षणामुळे धक्का बसलेला आहे. ठाणे महापालिकेतील 141 जागांपैकी 50 टक्के आरक्षणानुसार 71 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 10 जागांपैकी 5 महिला, अनुसूचित जमातीच्या 3 जागांपैकी 2 महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर 64 जागा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहेत.

एकूण 47 प्रभागांपैकी 24 प्रभागामध्ये आता हमखास दोन-दोन महिला नगरसेविका निवडून येतील. पॅनलमधील तीन पैकी दोन जागांवर अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण पडल्याने माजी उपमहापौर पल्लवी कदम यांचे तिकीट धोक्यात आले आहे. त्यांना खुल्या गटातून लढावे लागेल अथवा त्यांच्या पतीला उमेदवारी द्यावी लागेल. माजी महापौर नरेश म्हस्के आणि माजी सभापती विकास रेपाळे यांच्यापैकी एकाला आपला वॉर्ड सोडावा लागेल. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांच्यापैकी एकालाच संधी मिळेल. दुसर्‍याला पत्नीला रिंगणात उतरावे लागेल. दिवा परिसरातील 21 नगरसेवकांपैकी 13 जागा महिलांसाठी आरक्षित असून घोडबंदर परिसरातील 18 पैकी 10 नगरसेवक महिला आहेत.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 1 तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 36 जागा राखीव झाल्या आहेत. पालिकेतील 30 प्रभागांमधून 15 प्रभागांमध्ये हमखास दोन-दोन महिला नगरसेविका निवडून येणार. या आरक्षणामुळे दिग्गजांना यामध्ये कुठेही फटका बसलेला नाही. उल्हासनगरमध्ये 89 नगरसेवक असून त्यापैकी 45 जागा महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 1अ ही एकच जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून यंदा ती महिलेसाठी राखीव झाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 44 प्रभागांमधील 133 जागांपैकी अनुसूचित जातीच्या 7 महिला ,अनुसूचित जमातीच्या 4 महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासह 58 अशा एकूण 67 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. महिला नगरसेविकांची संख्या एकाने जास्त आहे. कल्याणात पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. अनुसूचित जातीसाठी 13 आणि अनुसूचित जमाती साठी 4 असे 17 प्रभाग आरक्षित आहेत.

नवी मुंबई महापालिकेतही 122 पैकी 61 महिला नगरसेविका करणार आता राज्य

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा : नवी मुबई महापालिकेच्या 2022 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत मंगळवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात काढण्यात आली. निवडणुकीनंतर अस्तित्वात येणार्‍या नवी मुंबई महापालिकेवर महिला राज असेल. कारण 122 पैकी तब्बल 61 महिला नगरसेवक असतील.

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षित होणार असल्याने ओबीसींच्या जागी खुल्या प्रवर्गातील इच्छुकाला संधी मिळाली आहे. या निवडणुकीत 61 महिला तर 61 पुरुष उमेदवार असतील आणि 40 प्रभाग हे तीन तर एक प्रभाग दोन सदस्यांचा असेल. निवडणूक आयोगाने अनुसूचित जातींसाठी 02, 04, 05, 06, 10, 11, 12, 23, 24, 31, 32 या प्रभागातील जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी प्रभाग 2 अ, प्रभाग 4 अ, प्रभाग 5 अ,प्रभाग 6 अ, प्रभाग 10 अ, प्रभाग 24 अ प्रभागातील सहा जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी 34 अ, 11ब हे दोन प्रभाग अनु. जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

महिलांचा खुला प्रवर्ग

109 पैकी 54 जागांवर महिला निवडून येणार आहेत. 54 जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्यापैकी 40 जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित 14 जागांसाठी चिठ्ठीद्वारे महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.

सर्वसाधारण महिला आरक्षित जागांसाठी 28 प्रभागातुन 14 महिला जागांसाठी सोडत जाहीर केली. त्यामध्ये प्रभाग 7 ब,प्रभाग 3 ब, प्रभाग 36 ब, प्रभाग 33 ब, प्रभाग 9 ब, प्रभाग 17 ब, प्रभाग 13 ब, प्रभाग 8 ब, प्रभाग 21 ब, प्रभाग 26 ब, प्रभाग 37 ब, प्रभाग 15 ब, प्रभाग 28 ब, प्रभाग 14 ब या प्रभागांचा समावेश आहे.

आरक्षण सोडती दरम्यान भाजपने पाठ फिरवल्याचे समोर आले. माजी नगरसवेक दिपक पवार वगळता दोन पदधिकारी असे तीनजन उपस्थित होते. तर कॉग्रेसकडून ही माजी नगरसेकव अंकुश सोनावणे, पदधिखारी रविंद्र सावंत तर शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी नगरसेवक, पदधिकारी तर आम आदमी पक्षाचे ही पदधिकारी यावेळी हजर होते.

Back to top button