नवी मुंबई : चार महिन्यांत 170 जणांचा अपघाती मृत्यू | पुढारी

नवी मुंबई : चार महिन्यांत 170 जणांचा अपघाती मृत्यू

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, शिळा-तुर्भे-कळंबोली, पनवेल-उरण, जेएनपीटी आणि पामबीच आदी मार्गांवर गेल्या चार महिन्यांत एकूण 215 अपघात झाले. या अपघातांत तब्बल 170 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. झालेल्या एकूण अपघातांत 55 टक्के अपघात हे दुचाकींचे असून पादचारी अपघात 34 टक्के आहेत.

नवी मुंबईतून जाणार्‍या महामार्गांवर जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत 215 अपघात झाले. या अपघातांत दुचाकींच्या 119 अपघातांची नोंद झाली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 75 जण गंभीर, तर 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना 74 अपघात झाले असून 36 जणांचा नहाक बळी गेला आहे. तसेच 36 जण गंभीर आणि दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.

महामार्गावर मोठ्या अवजड, चारचाकी वाहनांचे भीषण 89 अपघात झाले असून त्यामध्ये 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 गंभीर अपघातांत 125 जण जखमी झाले, तर किरकोळ 19 अपघातांत 26 जण जखमी झाले. झालेल्या एकूण 215 अपघातांत 55 टक्के अपघात दुचाकींचे असून 34 टक्के पादचारी अपघात आहेत. दुचाकी तसेच पादचारी अपघातांत मृत्यूचे प्रमाणे हे एकूण मृत्यूच्या 89 टक्के आहे. यंदा विनाहेल्मेट वाहन चालवणार्‍या 42 हजार 271 वाहनचालकांवर विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.

नवी मुंबईतील गेल्या चार महिन्यांतील ही अपघातांची आकडेवारी पाहता वेगमर्यादा ओलांडणे, मद्यप्रशान, लेन कटिंग करणे, झेब्रा क्रॉसिंगचा, पादचारी पुलाचा वापर न केल्याने हे अपघात घडल्याचा निष्कर्ष वाहतूक पोलिसांनी नोंदवला आहे. सर्वाधिक अपघात पामबीच मार्ग, सायन -पनवेल, शिळ- कंळबोली आणि जेएनपीटी मार्गावर झाल्याचे सांगण्यात आले. अनेकवेळा रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा नियम डावलून अवजड वाहन चालक वाहने चालवत असताना समोरील सिग्नल सुटताच अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Back to top button