राज्यात दंगे होऊ न देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार | पुढारी

राज्यात दंगे होऊ न देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी 1 मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभरात शांतता मार्च काढण्यात येणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांची साडेसातशे युनिट्स सज्ज आहेत, असे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दंगे घडवण्याच्या हेतूने धार्मिक तेढ वाढवणारी भाषणे केल्यामुळे त्यांना औरंगाबादमध्ये सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. परंतु या सभेला परवानगी देऊन महाविकास आघाडी सरकारने दंगे भडकवण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण केली आहे, असा आरोप रेखा ठाकूर यांनी केला. स्वार्थी राजकारणासाठी केले जाणारे हे प्रयोग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात शांतीचा संदेश देणारा शांतता मार्च 1 मे रोजी काढणार आहे. धार्मिक सद्भावना, सलोखा, शांती, जागरूकता कायम ठेवून दंगे होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1 मे रोजी शांतता मार्चची जोरदार तयारी करण्यात येत असून, त्यासाठी सर्व स्तरांवरील नेते, पदाधिकारी, कायकर्त्यांची साडेसातशे युनिट्स सक्रिय झाली असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.

Back to top button