मुंबईत पाण्याची बोंबाबोंब | पुढारी

मुंबईत पाण्याची बोंबाबोंब

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला. कोणतीही पूर्वसूचना नसताना पाणी पुरवठा न झाल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पश्चिम उपनगरातील 75 टक्के भागात पाणीच आले नाही. पूर्व उपनगरातील 60 टक्केपेक्षा जास्त भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

मुंबई शहराला ठाणे जिल्ह्यातून पाणीपुरवठा होतो. मात्र मंगळवारी सकाळी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा फटका मुंबईकरांना बसला. पुरवठा खंडित झाल्यामुळे भातसा धरणातून पिसे पंपिंग स्टेशन येथून पांजरापुर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणार्‍या पाणीपुरवठा मोठा परिणाम झाला.

त्यामुळे पांजरापुर जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहराला कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाला. त्यामुळे पश्चिम उपनगरातील 75 टक्के तर पूर्व भागातील 60 टक्के भागात दुपारनंतर होणारा पाणीपुरवठा झालात नाही. शहर विभागालाही याचा फटका बसला. शहरातील दादर, शिवडी, वडाळा, परळ, काळाचौकी, गिरगाव, काळबादेवी, फोर्टचा काही भाग, मलबार हिल, वरळी आदी भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होता.

पश्चिम उपनगरातही बांद्रा ते दहिसर पर्यंत 75 टक्के भागात पाणीच आले नाही. बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली व दहिसर भागातील नागरिकांना मोठा फटका बसला. पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी, मानखुर्द आधी भागातील पाणीपुरवठा वर मोठा परिणाम झाला होता. पूर्व उपनगरातील 60 टक्के भागात दुपारनंतर पाणीच आले नाही. त्यामुळे अनेक नागरिकांनी पाण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात धाव घेतली. अखेर महानगरपालिकेने काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला.

टँकरने पाणी पुरवठा !

इमारत व्यवसायिक व काही इमारती व झोपडपट्टी यांना टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी मंगळवारी अचानक झालेल्या वीज पुरवठा खंडितमुळे पाण्याची मागणी वाढली. दिवसभरात सुमारे एक हजार ते बाराशे टँकर पाणीपुरवठा करण्यात आला.

Back to top button