परीक्षा जूनमध्ये गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडणार | पुढारी

परीक्षा जूनमध्ये गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडणार

मुंबई ; पुढारी वृतसेवा : मुंबई विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षा 1 जून ते 15 जुलैदरम्यान होणार आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस ठरलेल्या परीक्षांचे काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परीक्षा जूनमध्ये गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी कुलगरूंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत परीक्षा ऑफलाईन आणि 1 जून ते 15 जुलै या कालावधीत घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. ऑफलाईन परीक्षेत बहुपर्यायी प्रश्‍न असावेत, असेही ठरल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, हा निर्णय विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे.

विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एप्रिल अखेरीसपासून या परीक्षा सुरू झाल्या आहेत. काही स्वायत्त महाविद्यालयांत ऑनलाईन परीक्षा पूर्ण होत आल्या आहेत, तर काही महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या सूचनांनुसार नियोजन केले आहे.

त्यामुळे विद्यापीठातील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन होणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षांच्या निकालानंतर काही विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी परदेशी जातात. हे विद्यार्थी पुढील शिक्षणाचे नियोजन कसे, करणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ऑफलाईन परीक्षेबाबत गोंधळ

ऑफलाईन परीक्षेत केवळ बहुपर्यायी प्रश्‍न असावेत, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांत मात्र दीर्घोत्तरी प्रश्नांचाही समावेश आहे. त्यामुळे सरकारने आदेश काढून संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

Back to top button