भगतसिंह कोश्यारी म्हणाले, वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर करावा | पुढारी

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर करावा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर करावा, जेणेकरुन सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

जुहू विले पार्ले मुंबई येथील कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते तर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. 13) झाले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे होत आहेत, तरी देखील आपल्या देशात अनेक ब्रिटिश कालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

कार्यक्रमाप्रसंगी न्या. दत्ता यांच्या पत्नी झुमा दत्ता, संस्थेचे अध्यक्ष ऍड. महेंद्र घेलानी, विश्वस्त जयंत घेलानी, जनक ठक्कर व डॉ मिनू मदलानी उपस्थित होते. खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी, विधिज्ञ सतीश मानेशिंदे व इतर निमंत्रित देखील यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन सर्वंकष अध्ययन केले पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे, असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

मौखिक व लेखी संवादकौशल्यावर भर हवा : न्या. दीपांकर दत्ता

विधी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्य शिकवण्यावर भर द्यावा. त्यांच्यासाठी समूह चर्चा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, अतिथी व्याख्याने, प्रकल्प व कार्यशाळांचे आयोजन करून त्यांच्या शिक्षणाच्या कक्षा रुंदवाव्या असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितले.

पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत प्रवेश घेऊन मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त होणारे आपण पहिले विधी पदवीधर ठरलो. शिक्षणाला अंत नसतो; न्यायाधीश हा आयुष्यभर विद्यार्थी असतो कारण तो कायद्यांची व्याख्या व उकल विविध रूपाने शिकतच असतो. जीवनात मोठे झाले तरीही विद्यार्थ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवावे, चिकाटी व संयम बाळगावा तसेच त्याग व सेवा या गुणांचा अंगीकार करून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन न्या. दत्ता यांनी केले.

Back to top button