मुंबई : पुढारी वृत्तसेवा
येत्या शनिवारी महाराष्ट्रात साजर्या होणार्या शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारने सोमवारी नियमावली जारी केली. त्यानुसार शिवज्योत दौडीत 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता 500 जणांना उपस्थित राहता येणार आहे. गृह विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.
औरंगाबादेतील शिवसेना आमदारांची भूमिका; एकच तारीख निश्चित करण्यासाठी सरकारला विनंती करणार
औरंगाबाद : राज्यात अनेक वर्षांपासून तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी दोन वेगवेगळ्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, आता दोन-दोन वेळा शिवजयंती नकोच, अशी भूमिका औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे. शिवजयंतीसाठी कोणतीही एकच तारीख निश्चित करा, असे साकडे या आमदारांच्या वतीने राज्य सरकारकडे घातले जाणार आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी
पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उद्योजक नितीन घोगरे यांचीही उपस्थिती होती. शिवसेनेकडून आतापर्यंत केवळ तिथीनुसारच शिवजयंती साजरी होत आली आहे. तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी शिवसेनेने कधीही शिवजयंती साजरी केलेली नाही. यंदा मात्र शहरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती थाटात साजरी करण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. सोबतच परंपरा म्हणून तिथीनुसारही यंदा शिवजयंती साजरी करणार असल्याचे सोमवारी सांगण्यात आले.
राज्यभरात एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली जावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. एकाच दिवशी शिवजयंती साजरी केल्यास मोठ्या प्रमाणात जल्लोष करता येईल. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिवजयंतीचा कोणताही एकच दिवस निश्चित केला पाहिजे. महाराष्ट्रात दोन शिवजयंती नकोत, अशी आमची सर्वांची भूमिका असून मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी करणार आहे, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.
काही ठिकाणी तारखेनुसार तर काही ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी होते. आधीच्या काळात ती तिथीनुसारच साजरी व्हायची. आता तारखेनुसार साजर्या केल्या जाणार्या शिवजयंतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह निर्माण होत आहे. त्यामुळे कोणत्याही एकाच तारखेला शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असे आमदार अंबादास दानवे म्हणाले.