गडचिरोली : तीन नगर पंचायतींमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष, तर कुरखेड्यात शिवसेना सत्तारुढ

गडचिरोली : तीन नगर पंचायतींमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष, तर कुरखेड्यात शिवसेना सत्तारुढ
Published on
Updated on

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : आज झालेल्या ५ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धानोरा, चामोर्शी व एटापल्ली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली. कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराने बंडखोरी केल्याने शिवसेना-काँग्रेस आघाडी सत्तारुढ झाली. तर अहेरी नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बंडखोर उमेदवारांच्या सहकार्याने सत्ता प्रस्थापित केली. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ९ नगरपंचायतींची प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील ५ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज झाली. धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आज तेथे पौर्णिमा सयाम नगराध्यक्ष, तर ललीत बरछा हे उपाध्यक्षपदी निवडून आले.

चामोर्शी येथे काँग्रेसच्या जयश्री वायलालवार नगराध्यक्ष, तर काँग्रेसचेच लोमेश बुरांडे हे उपाध्यक्ष झाले. एटापल्ली येथे काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम नगराध्यक्ष, तर मीना नागुलवार उपाध्यक्ष झाल्या. कुरखेडा येथे शिवसेनेच्या अनिता बोरकर नगराध्यक्ष, तर भाजपच्या बंडखोर जयश्री रासेकर उपाध्यक्ष झाल्या. तेथे भाजपने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. परंतु जयश्री रासेकर यांनी बंडखोरी करीत शिवसेनेला सहकार्य केल्याने भाजपला सत्तेतून बाद व्हावे लागले. आजच्या निवडणुकीदरम्यान कुरखेडा येथे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला.

अहेरी येथे आदिवासी विद्यार्थी संघाच्या रोजा करपेत नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शैलेंद्र पटवर्धन हे उपाध्यक्ष झाले. येथे शिवसेनेने आविसंला पाठिंबा दिला होता. अहेरी ग्रामपंचायत आणि आताच्या नगर पंचायतीत अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या पक्षाची सत्ता होती. मागील पाच वर्षे भाजपचे अंबरीशराव आत्राम यांचे समर्थक सत्तेत होते. परंतु आदिवासी विद्यार्थी संघाने पहिल्यांदाच आत्राम यांच्या राजघराण्याला सुरुंग लावला आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news