IPL Auction : कॅरेबियन खेळाडूंना ‘जॅकपॉट’ | पुढारी

IPL Auction : कॅरेबियन खेळाडूंना ‘जॅकपॉट’

बंगळूर ; वृत्तसंस्था : शनिवार (दि. 12) आणि रविवारी (दि. 13) बंगळूर येथे झालेल्या आयपीएलच्या महालिलावात (IPL Auction) जवळपास 204 खेळाडू विकले गेले आहेत. त्यातील 67 खेळाडू हे विदेशी आहेत. 10 संघांनी लिलावापूर्वी 33 खेळाडूंना रिटेन केले होते. यात 10 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 77 विदेशी खेळाडूंनी बक्‍कळ कमाई केली आहे; पण यामध्ये वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी जास्त छाप सोडली असून, त्यांचे सर्वाधिक 17 खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

लिलावात प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 8 विदेशी खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली होती. लखनौ सुपरजायंटस्, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जने प्रत्येकी 7 विदेशी खेळाडू घेतले. तर इतर सात संघांनी आपला 8 विदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण वापरून घेतला.

यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL Auction) विदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीजच्या 17 खेळाडूंनी 81.45 कोटी रुपये मिळवले. यात आंद्रे रसेल, निकोलस पूरन, जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोमरियो शेफर्ड, कायरन पोलार्ड, सुनील नारायण, ओडेन स्मिथ, ड्वेन ब्रावो, रोवमन पॉवेल, अल्झारी जोसेफ, इविन लुईस, डॉमिनिक ड्रॉक्स, शेरफेन रदरफोर्ड, फॅबियन अ‍ॅलेन, ओबेड मॅकॉय, काईल मेयर्स यांचा समावेश आहे.

आयपीएल लिलावात यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला असायचा. यंदा मात्र फ्रेंचाईझींनी कांगारूंबाबत हात आखडताच घेतला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंची उपलब्धता. या देशाची द्विपक्षीय मालिका, खेळाडूंची वैयक्‍तिक कारणे यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल सोडण्याचा निर्णय पटकन घेतात. याचा फटका एकदा मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला आला आहे, त्यामुळे फ्रँचाईझी ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत सावध राहिले.

यंदाच्या लिलावात (IPL Auction) ऑस्ट्रेलियाच्या 13 खेळाडूंवर बोली लागली. या 13 खेळाडूंना मिळून 59.85 कोटी रुपये मिळाले. यात पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, जॉश हेडलवूड, डॅनियल सॅम्स, जेसन बेरहनडॉर्फ, सीन एबॉट, रिले मेरेडिथ, मॅथ्यू वेड, नॅथन एलिस, नॅथन कुल्टर नाईल, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस यांचा समावेश आहे.

इंग्लिश खेळाडूंना 64.75 कोटी

जोफ्रा आर्चर, टाईमल मिल्स, सॅम बिलिंग्ज, ख्रिस जॉर्डन, अ‍ॅलेक्स हेल्स, बेनी हॉवेल, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, मार्क वूड, लियम लिव्हिंगस्टोन, जॉस बटलर, मोईन अली, डेव्हिड विली या 13 इंग्लिश खेळाडूंना यंदाच्या लिलावात बोली लागली. या 13 जणांना मिळून लिलावात 64.75 कोटी रुपये मिळाले.

आफ्रिकेच्या 11 जणांना 44.30 कोटी

कॅगिसो रबाडा, फाफ डू प्लेसिस, क्‍विंटन डिकॉक, डेवोल्ड ब्रेविस, एडेन मार्करम, मार्को जानसेन, ड्वेन प्रिटोरियस, डेव्हिड मिलर, लुंगी एंगिडी, रासी वान डेर डुसन, एनरिच नोर्त्झे या 11 जणांसाठी संघांनी एकूण 44.30 कोटी रुपये खर्च केले.

Back to top button