आजकालच्या तरुणांमध्ये काहीतरी नवीन करण्याची क्षमता, वेगळा विचार करण्याची सवय इत्यादी सर्व गुण आहेत, पण जे काही मिळवायचे ते झटपट मिळवण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते शॉर्टकटचा आधार घेतात. पण शॉर्टकट ने मिळालेले यश हे तात्पुरते असते, याची त्यांना कल्पना येत नाही.
एखाद्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती घेऊन व त्यात असामान्य काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान घेऊन मगच त्या क्षेत्रात उतरायला हवे. पण काही तरुणांना मात्र यश मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज वाटत नाही. त्यामुळे थोडेसे ज्ञान मिळवल्यानंतर ते आंधळेपणाने त्या क्षेत्रात उतरतात. पण दूरगामी विचार नसल्यामुळे काही दिवसांनंतर त्यांना आपला निर्णय चुकल्याचे जाणवू लागते. आता पुन्हा मागे जाऊन पहिल्यापासून सर्व सुरू करणे शक्य नसल्याने त्यातूनच मग नैराश्य येते.
या सगळ्यावर काय उपाय आहे? तर संयम, मेहनत करण्याची तयारी व इच्छाशक्तीचा विकास हे यावर उपाय आहेत. एखाद्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर यशाच्या मागे धावण्याऐवजी त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त केल्यास यश मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.
यश मिळवण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे. काही तरुण दोन-चारवेळा अपयश आले की लगेच 'आपल्याला जमणार नाही' असे म्हणून प्रयत्न सोडून देतात. पण याबाबतीत थॉमस एडिसनचे उदाहरण आदर्श ठरेल. थॉमस एडिसनने विजेचा शोध लावण्यासाठी 10 हजार प्रयोग केले. त्यानंतर त्याला विजेचा शोध लागला. एडिसनकडे इतका संयम होता म्हणून तो विजेचा शोध लावू शकला.
एडिसनच्या या उदाहरणात मेहनत करण्याची तयारी, संयम, प्रखर इच्छाशक्ती असे यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण लपलेले आहेत. याप्रमाणे अशी शेकडो उदाहरणे देता येतील ज्यातून मोठे यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट उपयोगाचा नाही हे सिद्ध होईल. शॉर्टकट हे उतावळेपणाचे लक्षण आहे आणि उतावळेपणाने कुठलेही यश मिळवता येत नाही. मोठे व चिरकालीन यश मिळवण्यासाठी संयम व सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते.
आजकालच्या फास्ट लाईफस्टाईल आवडणार्या तरुणाईला या गोष्टी पचणे थोडे कठीण आहे. पण थोडा विचार केल्यास हाच मार्ग बरोबर असल्याचे लक्षात येईल. कारण आग काय आहे, हे समजण्यासाठी दरवेळी हात पोळून घेतला पाहिजे असे नाही. आगीच्या धगीची कल्पना आपल्याला लांबूनही येते. त्याचप्रमाणे शॉर्टकटच्या फोलपणाची कल्पना थोडा दूरगामी विचार केल्यास येऊ शकते.
आयुष्यात कमी वेळात जास्त यश मिळवण्याची इच्छा असणे साहजिक आहे. कुणाला झटपट यश नको आहे? पण तरुणाईच्याच भाषेत सांगायचे तर, थोडासा 'प्रॅक्टिकल' विचार केल्यास शॉर्टकटचा मार्ग कायम यश देणारा नसल्याचे लक्षात येईल.