Raigad Fort : रायगडसह जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटनस्थळे खुली | पुढारी

Raigad Fort : रायगडसह जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटनस्थळे खुली

रायगड; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर, आज दुपारपासून रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडसह सर्व ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Raigad Fort)

मात्र ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच कोरोना नियमांचे पालन करून या स्थळांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यातील ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये ९० टक्के लोकांनी पहिला आणि ७० टक्के लोकांना लसीचा दुसरा  डोस घेतला आहे, अशा जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या अकरा जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे.

महाड तालुक्यात किल्ले रायगडासह समर्थ रामदास स्वामी यांची शिवथरघळ व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या लढ्याचे सुप्रसिध्द चवदार तळे आदींचा ऐतिहासिक वास्तूंमध्ये समावेश आहे शासनाच्या या निर्णयाने रायगड जिल्ह्यातील या प्रमुख ऐतिहासिक स्थळांसह पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे व दोन्ही तालुक्यांतील लेण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश शासनाने निर्देशानुसार खुला केल्याने पर्यटक वर्गासह स्थानिक हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायगड जिल्ह्यांतील ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे बंद असल्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत होता. निर्बंध हटवावेत किंवा शिथील करावेत अशी मागणी विविध व्यावसायिक संघटनांकडून करण्यात येत होती. ३१ जानेवारी रोजी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्ह्यानिहाय लसीकरणाचे प्रमाण विचारात घेवून काही निर्बंध उठविण्याचे तर काही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Raigad Fort)

त्यानुसार अंत्ययात्रेसाठी असलेली उपस्थितीची मर्यादा हटविण्यात आली आहे. सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली आहेत. तरण तलाव, जल उद्यानांमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवेश देण्यात येणार आहे. धार्मिक , सामाजिक आणि स्थानिक कार्यक्रमांनाही मंडप, सभागृहाच्या क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान मागील आठवड्यातच स्थापन झालेल्या किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघाचे अध्यक्ष माजी राजीप उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ यादी शासनाने घेतलेल्या आजच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले असून किल्ले रायगड परिसरातील शेकडो बेरोजगारांना आता नव्या दे आपला व्यवसायासाठी काम करणे शक्य होईल असे मत व्यक्त केले.

रोपवे सेवा बुधवारपासून नियमितपणे सुरू होणार – रोपवे व्यवस्थापक राजेंद्र खातू !

दरम्यान, रायगड किल्ला शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आज ( मंगळवार ) दुपारी दोन वाजेपासून खुला करण्याचे आदेश देण्यात आले असुन पर्यटकांना गडावर जाण्यासाठी रोप वे चा वापर करता येण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती रायगड रोप वे प्रशासनाचे प्रमुख श्री राजेंद्र खातू यांनी दिली आहे.

Back to top button