लग्नगाठी स्वर्गात नाही, तर नरकात बांधल्या जातात | पुढारी

लग्नगाठी स्वर्गात नाही, तर नरकात बांधल्या जातात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सध्या अनेक ठिकाणी नवरा-बायकोमध्ये वाढत असलेले भांडणांचे प्रमाण आणि विकोपाला गेलेले वाद पाहता संसारातील आनंदच हरवून गेल्याची चिंता व्यक्त करताना उच्च न्यायालयाने लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही तर नरकातच बांधल्या जातात, अशी उपहासात्मक टिप्पणी करत एका प्रकरणात भांडकुदळ बायकोला झटका देत नवर्‍याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नवी मुंबईत राहणार्‍या नरेश आणि निला (नावात बदल केला आहे) यांचा 2017 मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्यांना मुलगाही झाला.2021 मध्ये निलाने नरेश विरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत 498 अ नुसार हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याविरोधात पती नरेशने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर नुकतीच न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी नरेशच्या वतीने निलाने केलेल्या आरोपांचा इन्कार करण्यात आला. हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचा दावा केला. निलाने घरासाठी 13 लाख दिल्याचा दावा खोटा आहे. घर खरेदीसाठी आपण 90 लाखांचे कर्ज घेतले. निलाने फक्त घरातील अंतर्गत सजावटीचा खर्च उचलला.तसेच लग्नानंतर तिला मॉरिशसला नेले होते.

तिला महागडा मोबाईल भेट दिला होता. तरीही ती त्रास देत होती, असा दावा नरेशच्या वतीने करत अ‍ॅड. सहानी यांनी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचा संदर्भ सादर केला. त्याबाबत त्याने अदखलपात्र गुन्हाही दाखल केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

तर निलाने लग्नात सोन्याचे नाणे दिले नाही म्हणून सुरुवातीला तिला टोमणे मारले जात होते. वेळावेळी अपमान केला जात होता. नोव्हेंबर 2019 मध्ये वाशी येथे घर खरेदीसाठी तिने 13 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र, तरीही नरेशकडून पैशांची मागणी थांबत नव्हती.

मी हल्ला केल्याचे सांगत नरेशने स्वतःला काही जखमाही करून घेतल्या आणि आपले 4 लाख 20 हजारांचे दागिने गिळंकृत केले. जाचाला कंटाळून आपण बहिणीकडे राहायला गेल्यानंतर त्याने तिथेही गाठून मुलाला भेटण्याची मागणी केली, असे आरोप निलाच्या वतीने करण्यात आले.

दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने या प्रकरणात पती-पत्नीचा वाद विकोपाला गेला आहे. नवरा-बायकोने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. ते एकत्र राहणे अशक्य आहे. त्यावर खटल्याच्या सुनावणीवेळी निर्णय दिला जाऊ शकतो. हा प्रश्न नवर्‍याच्या कोठडीने सुटणारा नाही. मात्र नवर्‍याने पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे, असे बजावत न्यायालयाने नवर्‍याला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडून देण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

Back to top button