पालम : काळ्याबाजारात जाणारा सात लाखांचा गव्हाचा साठा जप्त

पालम : काळ्याबाजारात जाणारा सात लाखांचा गव्हाचा साठा जप्त

Published on

पालम; पुढारी वृत्तसेवा: पालम ते गंगाखेड  राज्यमार्गावर केरवाडी शिवारात महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या एका पथकाने पकडलेल्या एका ट्रकमधून स्वस्त धान्य दुकानातून काळ्याबाजारात जाणाऱ्या गव्हाचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत ६१९ गव्हाचे कट्टे अंदाजे किंमत ७ लाख ७६ हजार ९०२ रुपये व ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.

महामार्ग पोलीस मदत केंद्राचे वाहन बुधवारी (दि.१) रोजी दुपारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पालम ते गंगाखेड या राज्यमार्गावरील पालम तालुक्यातील केरवाडी शिवारात महामार्गवर या पथकास एम.एच. २६-एडी. ६४८८ या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जाताना आढळला. या पथकाने ट्रकचालकास ट्रक थांबविण्याचा इशारा केला. परंतु, ट्रक चालक वेगाने पुढे जात होता.

यानंतर या पथकाला संशय आल्याने अर्धा किलोमीटर त्यांनी पाठलाग करून ट्रक थांबविण्यात आला. यानंतर ट्रकची चौकशी सुरू केली. तेव्हा ट्रक चालकाने व क्लिनरने उडवाउडवीची उत्तरे दिली. या पथकाने ट्रकमधील मालाची तपासणी केली असता गव्हाचा मोठा साठा ट्रकमध्ये आढळून आला.

पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे, रविद्र नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, एएसआय राजाभाऊ कातकडे, सुरेश टाकरस, पोलीस नाईक संजय पुरी व श्याम काळे यांच्या पथकाने ही पाहाणी केली. यावेळी हा साठा स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या गव्हाचा असल्याचा संशय आल्याने ट्रक चालक व क्लिनर यांना विश्वासात घेवून पोलिसांनी चौकशी केली. यानंतर त्यांनी गव्हाचा साठा गंगाखेड येथील आशिष ट्रेडिंग कंपनी येथून भरला असल्याचे व हैदराबाद परिसरातील सुप्रीम ऍग्रो आटा मिल यांच्याकडे तो उतरविण्यात करता नेत असल्याचे नमूद केले.

ट्रकमध्ये ७ लाख ७६ हजार ९०२ रुपयांचा साठा जप्त

या ट्रकमध्ये गव्हाची ६१९ कट्टे (३५४७५ किलो ग्रॅम) अंदाजे किंमत सात लाख ७६ हजार ९०२ रुपये साठा आढळून आला.

महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या या पथकाने ट्रक चालक मोहम्मद गौस मोहम्मद याखूब (रा. नांदेड) आणि क्लिनर आयुब खान सुभान खान या दोघांना व मालासह ट्रक पालम पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

पोलीस अधीक्षक डाँ. जमादार, उपअधिक्षक डॉ. टिपरसे, पोलीस निरीक्षक केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अर्चना करपुडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, राजाभाऊ कातकडे, पोहेकॉ सुरेश टाकरस, पोलिस नाईक संजय पुरी, शाम काळे यांनी केलेल्या या कार्यवाहीने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारा गव्हाचा साठा काळ्या बाजारात जाताना पुन्हा पकडला गेल्याने गंगाखेड व पालम तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही गंगाखेड येथील गोदामात तसेच वाहनात बेकायदेशीरपणे गव्हाचा मोठा साठा आढळून आला होता.

या घटनेमुळे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.  यामुळे परभणी जिल्हा महसूल प्रशासनाने गव्हाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news