उच्चविद्याविभूषित महिलांनाही धम्म दीक्षेचे वेध | पुढारी

उच्चविद्याविभूषित महिलांनाही धम्म दीक्षेचे वेध

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : जगाच्या कल्याणासाठी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला धम्म समतेवर आधारित आहे. या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आजपर्यंत पुरुषच आघाडीवर होते; परंतु आता महिला आणि उच्चशिक्षित तरुणींनीही यात आघाडी घेतली आहे. वर्षभरात सुमारे 60 ते 70 महिला दीक्षा घेत असून, श्रामणेरांची संख्या 150 ते 200 पर्यंत पोहोचली आहे. दीक्षा घेऊन या भिक्खुणी बुद्ध धम्माचा देश-विदेशात प्रचार-प्रसार करीत आहेत.

भारतातील पहिले महिला भिक्खू सेंटर चालवणार्‍या भिक्खुणी प्रा. धम्मदर्शना महाथेरी सांगतात की, सुरुवातीला केवळ पुरुषच (श्रामणेर) बौद्ध धम्माची दीक्षा घेत होते; परंतु भारतात पहिले महिला भिक्खू सेंटर उपलब्ध झाल्याने दीक्षा घेण्याकडे महिलांचा (श्रामणेरी) कल वाढला आहे. समाजाची गरज ओळखून बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणीही पुढाकार घेत असून, येथील महिला भिक्खू सेंटरमध्ये प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर अशा विविध शाखांचे शिक्षण घेत असलेल्या व हे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणी असल्याची माहितीही महाथेरी यांनी दिली.

2019 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या भीमटेकडीवर आकारास आलेल्या महिला भिक्खू सेंटरमधून आजपर्यंत एक ते दीड हजार महिलांंनी श्रामणेरीची दीक्षा घेतली आहे. मराठवाड्यात बौद्ध धम्माची दीक्षा देणारे छत्रपती संभाजीनगर हे महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी बुद्ध लेणी, भीमटेकडी, लोकुत्तरा महाविहार व मुकुंदवाडी परिसरातील तक्षशिला बुद्धविहार आदी ठिकाणी श्रामणेरींची दीक्षा देण्यात येते.

धम्म जाणून घेण्यासाठी…

श्रामणेरी शिबिर 10 दिवसांचे असते. घर, कुटुंबीयांपासून पूर्णपणे वेगळे राहून ही दीक्षा ग्रहण करावी लागते. महिला घरसंसार सोडून येण्यास धजावत नव्हत्या, त्यामुळे त्यांचे प्रमाण नगण्य होते; परंतु धम्म जाणून घेणार्‍यांची तळमळ महिलांत दिसून येत असल्याने त्या धम्म दीक्षेकडे वळत आहेत. महिलांचे प्रमाण पूर्वीपासूनच नगण्य होते, आता त्यात 40 टक्के वाढ झाल्याची माहिती धम्मदर्शना महाथेरी यांनी दिली.

विदेशी भिक्खूंकडून प्रशिक्षण

बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार यंत्रणा कशी राबवावी, यासाठी चौका घाटावर असलेल्या लोकुत्तरा महाविहारात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भिक्खू संघ येथील भिक्खू संघांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामुळे येथील भिक्खू संघालाही बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी मोठा हातभार लागला आहे.

Back to top button