सिल्लोड पोलीस ठाण्यासमोरील जमावाच्या गोंधळांनतर जरांगे पाटील समर्थकांची सुटका | पुढारी

सिल्लोड पोलीस ठाण्यासमोरील जमावाच्या गोंधळांनतर जरांगे पाटील समर्थकांची सुटका

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्यास जाणार होते. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावे असे आवाहन करणाऱ्या पाच समर्थकांना भांबेरी येथून रविवारी (दि. २५) पोलिसांनी ताब्यात घेऊन सिल्लोड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले होते. आज त्यांना सोडण्यात आले होते.

रविवारी जरांगे पाटील यांच्या पाच समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर आज सिल्लोड पोलीस ठाण्यासमोर जमावाने गोंधळ घातला होता. त्यानंतर दिवसभर झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या पाच लोकांना सोमवारी (दि. २६) सायंकाळी अखेर सिल्लोड पोलीसांनी सोडले. छत्रपती संभाजीनगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, घनसावंगी पोलीस, अंबड पोलीस, व जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कलम ६९ मुंबई पोलीस कायद्यान्वये ताब्यात घेतले होते. जालना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बघता त्यांना जालना येथे न ठेवता सिल्लोड पोलीस ठाण्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली.

रमेश दामोदर तारख (रा.सराटी अंतरवाली), श्रीराम एकनाथ कुरणकर (रा.कुरण ता अंबड), शैलेंद्र शिवाजी पवार (रा तिर्थपुरी ता घनसावंगी), बाळासाहेब बंडेराव तरवडे (रा बडेगाव जि जालना), बाळासाहेब बाबासाहेब इंगळे (रा अंबड) अशी सिल्लोड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याच प्रमाणे जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी जालना जिल्हा पोलिसांनी ही कार्यवाही केल्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी सांगितले.

मात्र घटनेची माहिती मिळताच जालना जिल्ह्यातील व सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या लोकांनी सिल्लोड पोलीस ठाण्यातगर्दी केली होती. जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगीत झाल्याने व सिल्लोड येथील मराठा क्रांती मोर्चाचे व सिल्लोड तालुका नियोजन समितीचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश मिरकर, डॉ. शेखर दौंड, बंटी पाटील शिंदे, अड. वैभव तायडे ,अंकित पाटील, सुखदेव पाटील भगत, डॉ. संतोष पाटील शिंदे, दत्ता पाटील पांढरे, मारुती पाटील वराडे यांनी सिल्लोड पोलिसांची भेट घेऊन ही दडपशाही सहन करणार नाही. नजरबंद केलेल्या लोकांना सोडा यासाठी सिल्लोड पोलीस ठाण्यासमोर सोमवारी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत पोलिसांच्या या कार्यवाहीचा निषेध करून धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली. त्यानंतर सायंकाळी सर्व ताब्यात घेतलेल्या समर्थकांना सोडले.

Back to top button