हिंगोली : हळदीच्या बेण्याला डिमांड; दर पोहोचले 5 हजारांवर | पुढारी

हिंगोली : हळदीच्या बेण्याला डिमांड; दर पोहोचले 5 हजारांवर

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : यंदा मिळालेल्या समाधानकारक दरामुळे शेतकर्‍यांचा कल हळद लागवडीकडे वाढला आहे. सध्या शेतशिवारात हळद लागवडीचे लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे हळदीच्या बेण्याला मोठी मागणी आहे. सध्या हळदीच्या बेण्याला प्रतिक्‍विंटल 5 हजार रूपयांचा दर मिळत आहे. यंदा जवळपास 75 हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होईल असा अंदाज व्यक्‍त होत आहे. यंदा दहा वर्षानंतर हळदीला 16 ते 17 हजार रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्यामुळे हळद उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक लाभ झाला. परिणामी शेतकर्‍यांचा कल हळद लागवडीकडे वाढला आहे.

गतवर्षी 50 हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली होती. परंतू, पाऊस कमी झाल्याने तसेच मुळकुजव्या व करपा रोगाच्या प्रादुर्भावाने हळदीच्या उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट झाली होती. उत्पादनात घट झाली असली तरी दर मात्र चांगला मिळाल्याने घटलेल्या उत्पादनाची कसर दरवाढीतून निघाली. यंदा हळदीला सुरूवातीपासूनच 15 हजार ते 18 हजार रूपयांपर्यंतचा दर मिळाला. दहा वर्षानंतर प्रथमच हळदीने 18 हजार रूपयांचा टप्पा पार केला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मालामाल झाले.

अजून किमान दोन वर्ष तरी हळदीचे दर दहा हजारांच्या आसपास राहतील असा अंदाज व्यक्‍त होऊ लागल्याने शेतकर्‍यांचा हळद लागवडीकडील कल वाढला आहे. अनेक शेतकर्‍यांनी एप्रिल महिन्यातच बेणे खरेदी करून लागवडीचे नियोजन केले होते. तर आता बाहेरून आलेले बेणे खरेदी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. सध्या हळदीच्या बेण्याला प्रतिक्‍विंटल 5 हजार रूपयांचा दर मिळत आहे. एकरी 10 ते 12 क्‍विंटल बेणे लागते. त्या हिशोबाने 50 ते 60 हजार रूपये हळदीच्या बेण्याला खर्च येत आहे. हळदीसाठी लागवड खर्च मोठा असला तरी हळदीला एकरी 25 ते 30 क्‍विंटलचे उत्पादन येते. त्यामुळे बागायतदार शेतकरी हळदीच्या लागवडीकडे वळले आहेत.

हिंगोली दुसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ

हळदीसाठी सांगलीनंतर हिंगोलीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील हिंगोली व वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात लाखो पोत्यांची वर्षभरात उलाढाल होते. त्यामुळे हिंगोली येथील मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. त्यातच वसमत येथे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कार्यान्वित झाल्याने पुढील काही वर्षात हळदीच्या संशोधनात क्रांती होणार असल्याने शेतकर्‍यांना दर्जेदार बेणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा हळदीचे हब म्हणून विकसित होईल अशी शक्यता व्यक्‍त होऊ लागली आहे.

Back to top button