बीड : महसूल पथकाची धडक कारवाई, एक हायवासह दोन ट्रक जप्त | पुढारी

बीड : महसूल पथकाची धडक कारवाई, एक हायवासह दोन ट्रक जप्त

गेवराई : पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्या दरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री केली.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई करत असून यामुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते.

नदीपात्रात पाणी असतानादेखील वाळू माफिया दिवसभर वाळू उपसा करुन ती रात्री हायवा व ट्रकमधून चोरट्या मार्गाने वाहतूक करतात. याविरोधात महसूल, पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असतानादेखील वाळू माफिया या कारवायांना भीक घालत नसून महसूल, पोलिस अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून वाळू उपसा व वाहतूक करतात.

बुधवारी रात्री अशाचप्रकारे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव या ठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकासह त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी एक हायवा, दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही वाहने चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : एस टी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीला जबाबदार कोण?

Back to top button