शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील ( Shakti Mills Gang Rape ) तीन आरोपींची फाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१३साली एका फोटो जर्नलिस्ट महिलेवर झालेल्या पाशवी बलात्कारमुळे मुंबईसह देशभरात मोठे पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना २४ तासांत गजाआड केले होते.
देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबईला हादरवून सोडणारी शक्ती मिल सामूहिक बलात्कार घटना ( Shakti Mills Gang Rape 22 ऑगस्ट 2013 रोजी घडली होती. मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये सायंकाळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. शक्तीमिलमध्ये उपस्थित असलेल्या आरोपींनी आमच्या परवानगी शिवाय फोटो काढू शकत नाही. असे सांगत महिला छायाचित्रकार आणि त्याच्या सहकाऱ्याला आतमध्ये नेले. त्यानंतर आरोपींनी दोघांनाही मारहाण करत महिला छायाचित्रकाराच्या सहकाऱ्याला बांधून ठेवले. त्यानंतर पाच नराधमांनी या छायाचित्रकार तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला होता.
दोन तासानंतर कशीबशी या दोघांनी नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करत रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली.
पोलीस तपासादरम्यान याच आरोपींचा सहभाग असलेले शक्तीमिलमधील आणखी एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले. यातील तीन आरोपींनी एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरवर 31 जुलै 2013 रोजी सामूहिक बलात्कार केला होता. अखेर पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात आरोपींवर ऑक्टोबर 2013 मध्ये सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दोन्ही प्रकरणात पीडितांकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी मानले. यातील अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तर, सिराज खान याला जन्मठेपेची व अन्य तीन नराधम विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अन्सारी यांना मुंबई सत्र न्यायालयाने 04 डिसेंबर 2014 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.