मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीसह बीड जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत | पुढारी

मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीसह बीड जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.परळी येथे झालेल्या सभेत या स्वागताला उत्तर देताना धनंजय मुंडे भाऊक झाले. जो विश्वास आणि जे प्रेम या जनतेनं माझ्यावर केलं आहे, त्याची परतफेड मी असंख्य जन्मातही करू शकणार नाही, असे म्हणत तुमची कायम मान उंचावेल असेच कर्तृत्व करेन असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

मंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचा परळीत भव्य नागरी सत्कार झाला. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वेळेची कमतरता असतानाही धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यांनी सांगितले की, मी परळीकरांना शब्द दिला होता की राजकीय पटलावर ज्यावेळी काही उलथा पालथी घडतील त्यावेळी परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काही होणार नाही, आज ते सिद्ध झाले आहे.काही महिन्यापूर्वी याच मातीत मी म्हटलं होतं ‘जरा सा वक्तने साथ क्या ना दिया, लोग मेरी काबिलियत पे शक करने लगे’ आज आपण काबिल आहोत हे मी देशाला दाखवून दिलं आहे. सत्ता येत असते, जात असते पण वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार विसरायचे नसतात. 2010 ला विधान सभेला मी लायक असतानाही मला विधान परिषद लढवावी लागली. सभागृहात जायला 2 मतं कमी होती, त्या परिस्थितीत अजित दादांनी मदत केली मला विधान परिषदेवर संधी मिळाली.आता मंत्री झालोय, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणं अवघड नसतं पण वेळ लागेल, नाराज होवू नका, विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी जी जी वचनं दिली होती ती वचनं मी वर्षभरात पुर्ण करेल असे त्यांनी सांगितले.

आज खुप काही बोलायचं होतं पण वेळ नाहीयं, त्यामुळं जास्त बोलता येत नाही, मात्र याच जागेवर राज्याच्या अख्ख्या मंत्रीमंडळाला तुमच्या समोर आणेल. आपल्याला दादांचं, एकनाथ शिंदेचं, फडणवीसांचं ऋण व्यक्त करायचं आहे. शेवटी इतकंच सांगतो विश्वास ठेवा जिथं जाल तिथं मान उंच करून सांगाल, तुम्ही वैद्यनाथाच्या परळीचे आहात आणि तुमचा लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आहे. कायम अभिमान वाटेल असं काम करेल असे म्हणत धनंजय मुंडे भावूक झाले.

परळीत आगमन होताच ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत झाले.परळीत येताच बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन घेऊन ते सभास्थळी आले. वेळेची मर्यादा असल्याने त्यांनी उपलब्ध वेळेत आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वागत सोहळा व सभेला हजारोंचा विराट जनसमुदाय उपस्थित होता.

Back to top button