Raosaheb Danve: ‘रामेश्वर’ साखर कारखान्यावर रावसाहेब दानवेंचेच वर्चस्व | पुढारी

Raosaheb Danve: 'रामेश्वर' साखर कारखान्यावर रावसाहेब दानवेंचेच वर्चस्व

भोकरदन: पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे  (Raosaheb Danve) यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी केवळ २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत दानवे यांच्या पॅनल विरोधात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना एक गट सोडून एकही उमेदवार देता आला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होत असल्याचे दिसत आहे.

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेपर्यंत ऊस उत्पादक गट व राखीव मतदारसंघातील २१ जागांसाठी २३ जणांचे अर्ज आले. यामध्ये केवळ टेंभुर्णी ऊस उत्पादक गटातील ३ जागेसाठी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. या निवडणुकीत आ. संतोष दानवेसह १८ उमेदवारांचेच अर्ज दाखल आहेत. यामुळे यांची निवड बिनविरोध यासारखी असून केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दिसत (Raosaheb Danve)  आहे.

दरम्यान, राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांना आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका महाविकास आघाडीचे नेते चांगली टक्कर देतील अशी अपेक्षा होती. मात्र रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजल्याचे राजकीय नेते बोलून दाखवत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) केवळ कारखान्याचे पॅनल सर्व मिळून लढवता आले नाही तर आगामी काळात होणाऱ्या निवडणुका ती काय लढवतील तो कशा जिंकतील अशी टीका देखील त्यांच्यावर होत आहे.

यावेळीच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी दिली आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची २० जून रोजी छाननी होणार आहे. २१ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक संजय भोईटे, बी. आर. गिरी, डी. डी. बावस्कर, बी. टी. काकडे, एस. टी. रोठगे हे काम पाहत आहेत.

Raosaheb Danve : यांचे एकमेव अर्ज दाखल

पिंपळगाव रेणुकाई गटातून भगवान सोनुने, पंडित नरवडे, संजय लोखंडे. राजूर गटात गणेश फुके, विजय वराडे, कमलाकर साबळे, भोकरदन गटातून दादाराव राऊत, प्रकाश गिरणारे, मधुकर तांबडे, जाफराबाद गटातून सुरेश परिहार, आत्माराम चव्हाण, महादू दुनगहू. टेंभुर्णी गटातून जगन बनकर, माधवराव गायकवाड, कौतिकराव वरगणे, जगन वरगणे, श्रीराम गाडेकर, सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार संतोष दानवे. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून रामराव हिरेकर, महिला मतदारसंघातून शोभाताई मतकर, तान्हाबाई भागीले, इतर मागासवर्गीय मतदार संघातून विलासराव आडगावकर, विमुक्त जाती-जमाती मागास प्रवर्गातून सुरेश दिवटे यांचे अर्ज आले आहेत.

आमच्या मतदार संघाचे आमच्या आघाडीतील प्रमुख म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आहेत. त्यांनी या निवडणुकीत पुढाकार घेतला असता तर आम्ही निश्चितपणे या निवडणुकीला सामोरे गेलो असतो. मात्र कोणतेच नियोजन समन्वय नसल्याने हे चित्र पाहायला मिळाले.

– राजाभाऊ देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

मागच्या गेल्या काही वर्षापासून कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. त्यांची सदस्य संख्या अधिक आहे. आमच्याकडे काही उमेदवार होते मात्र मतांची संख्या जुळत नाही हे गृहीत धरून आम्ही आमची ताकद दाखवली नाही. मात्र या निवडणुकीचा पुढील कोणत्याही निवडणुकीवर परिणाम होणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करू आणि दोन्ही निवडणुकीत भाजपचा पराभव करू असा ठाम विश्वास आहे.

– चंद्रकांत दानवे, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा 

Back to top button