बुलढाणा : वाहनांच्या डिक्कीतून ऐवज लंपास करणारी “छर्रा गॅन्ग” जेरबंद | पुढारी

बुलढाणा : वाहनांच्या डिक्कीतून ऐवज लंपास करणारी "छर्रा गॅन्ग" जेरबंद

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : खामगांव शहरातील गांधी चौकात दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाख रुपये लंपास करणारी आंतरराज्यीय सराईत ९ चोरट्यांची टोळी बुलढाणा एलसीबी व शेगाव शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे.

शेगाव शहरातील आनंदसागर जवळ चारचाकी आणि दुचाकी गाडीसह १० संशयित व्यक्ती दरोडा टाकण्याच्या प्रयत्नासाठी लपून बसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळले होते. त्यावेळी अजय अशोक तमंचे (४२), जिग्नेश दिनेश घासी (४४), रितीक प्रविण बाटुंगे (२३ रा. कुबेरनगर, गुजरात) या संशयित चोरट्यांना पोलीसांनी जागेवरच पकडले होते. तसेच अन्य ७ आरोपी पळून गेले होते. आरोपीच्या ताब्यातून दुचाकीची बनावट नंबरप्लेट बनविण्याचे रेडीयम स्टिकर, वाहनाचे लॉक तोडण्यासाठीची सामग्री, दोन धारदार चाकू, चार पेचकस, एक कैची, मिरची पावडर, रोख सहा लाख रक्कम, चारचाकी आणि दुचाकी असा ६,७६,८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान या आरोपींनी खामगांव, अकोला व यवतमाळ येथे यापूर्वी बॅग लिफ्टींग केली असल्याची माहिती मिळाली.

फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांनी एक विशेष पथक तयार करुन अहमदाबादकडे (गुजरात) पाठवले होते. या पथकाने अहमदाबाद शहरातील छर्रा नगर, कुबेर नगर या परिसरात शोध घेतला असता, आरोपी पावागड येथील यात्रेत गेल्याची माहिती मिळाली. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने पाठलाग करुन ६ आरोपींना २४ मार्चला अटक केली.

सन्नी सुरेंद्र तमांचे(35), दिपक धिरुभाई बजरंगे (40), मयूर दिनेश बजरंगे (39),राजेश ऊर्फ राकेश तमांचे (49), रवि नारंग गारंगे (55), मुन्ना मेहरुन इंदरेकर (६०) हे सर्व आरोपी रा. छर्रा नगर अहमदाबाद (गुजरात) येथील आहेत. आरोपी हे गुजरात मधून निघतांना एक – दोन चारचाकी वाहने व तीन चार दुचाकी घेवुन एक ठिकाण निवडतात व त्या ठिकाणाजवळ प्रसिध्द देवस्थान शोधतात व तेथे राहतात. महाराष्ट्रामध्ये आरोपी हे यापूर्वी शेगांव, माहुर व शिर्डी येथे थांबले होते.आरोपी दोन गट बनवितात त्यापैकी एक गट बँकेमध्ये जावून मोठी रक्कम काढणा-या ग्राहकाची टेहेळणी करतात व नंतर त्याचा पाठलाग करून अन्य साथीदारांना माहीती देतात.

ग्राहकाने पैशाची बॅग गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली असल्यास ५ ते १० सेकंदामध्ये डिक्कीचे लॉक तोडुन रक्कम लंपास करतात व हातात बैघ असल्यास हिसकाऊन घेवून गाडीवरुन फरार होतात. बॅगमध्ये जास्त पैसे असल्यास एक टिम तात्काळ चारचाकी वाहनाद्वारे पैसे घेवून फरार होते. गुन्हयात वापरलेल्या गाडीचा क्रमांक हा बनावट असतो. नवीन नंबर बनविण्याचे साहित्य ते सोबतच बाळगतात. पकडलेल्या टोळीने दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात असे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एलसीबीचे एपीआय विलास सानप,पोलीस नाईक गणेश पाटील, युवराज राठोड, गजानन गोरले, पोलीस कॉन्स्टेबल विजय सोनोने यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपींवर खामगाव,अकोला व यवतमाळ तसेच महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये या अगोदर चोरी, जबरी चोरी व दरोडा यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Back to top button