ओला दुष्काळ जाहीर करून ५० हजारांची मदत करा : आमदार मेघना बोर्डीकर | पुढारी

ओला दुष्काळ जाहीर करून ५० हजारांची मदत करा : आमदार मेघना बोर्डीकर

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची तत्काळ मदत करावी, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे निवेदनाव्‍दारे केली आहे.

आमदार बोर्डीकर यांनी निवेदनात म्‍हटले आहे की,  परभणी जिल्ह्यात ११ जुलै रोजी ढगफुटी झाली. तसेच मागील तीन ते चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी वाहून गेल्या असून पिके संपूर्ण पाण्यात बुडालेली आहेत. यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.

प्रमुख रस्त्यावरील अनेक पूल वाहून गेले आहेत. वाहतूक देखील खोळंबली आहे.

यावर्षी पावसाने सीमा ओलांडली असून मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे शेती पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

विशेषत: यावर्षी परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी होण्याची ही तिसरी वेळ आहे.

काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पाण्यासोबत वाहून गेली आहेत.

शिल्लक पिकांना मोड फुटले आहेत. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून असलेला कापूस सध्या पूर्णतः पाण्यात बुडालेला आहे.

शेतकरी सध्या खूपच अडचणीत आहे. यामुळे कोणताही सोपस्कर न करता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर किमान ५० हजार रुपये तातडीने मदत जमा करावी, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी  निवेदनात केली आहे.

या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य व असंतोष पसरलेला आहे.

याचे गंभीर परिणाम होऊ नयेत यासाठी आपण आपल्या बळीराजाला तात्काळ मदत करून साथ द्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनाची एक प्रत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पाठविली असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button