नांदेड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कृष्णराव देशपांडे यांचे निधन | पुढारी

नांदेड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कृष्णराव देशपांडे यांचे निधन

देगलूर : पुढारी वृत्तसेवा : देगलूर (ता. लिंबा) येथील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, समाजवादी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कृष्णराव नरहरराव देशपांडे (वय ९५) यांचे आज (दि.२३) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने शोक सलामी देण्यात आली. तर महसूल प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, माजी आमदार गंगाधरराव पटणे, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कृष्णराव देशपांडे यांनी समाजवादी नेते एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस मोहन धारिया, मधु लिमये, अनंत भालेराव, नानासाहेब गोरे, सुधाकरराव डोईफोडे, सदाशिवराव पाटील, एन. डी. पाटील, मृणालताई गोरे यांच्या समवेत स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. देशभरात आणीबाणी घोषित झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी १९ महिने तुरुंगवासही भोगला होता.

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे कृष्णराव देशपांडे यांच्यासह अन्य स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारने त्यांचा यथोचित सन्मान केला होता. देगलूर भूषण पुरस्कार देऊन देगलूर नगरपरिषदेने त्यांचा गौरव केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button