उस्मानाबाद : पाण्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या आईसह दोघांचा बुडून मृत्यू | पुढारी

उस्मानाबाद : पाण्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या आईसह दोघांचा बुडून मृत्यू

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : पाण्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या आईसह दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उमरगा तालुक्यातील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस शुक्रवारी (दि. १८) रोजी सकाळच्या अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सोनाली संतोष घुले (वय ३०, रा. जीवाचीवाडी, ता. केज. जि. बीड), सोहम संतोष घुले (वय ४) असे बुडून मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल साई साखर कारखाना परिसरात असलेल्या मंदिरा जवळ ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांचा ताफा आहे. यातील मजूर महिला सोनाली घुले ही शुक्रवारी सकाळी कपडे धुत होती. तिच्या जवळ असलेला तिचा मुलगा सोहम घुले हा खेळत असताना अचानक पाण्यात पडला. ही घटना सोनालीच्या तात्काळ लक्षात येताच तिने मुलास वाचविण्याचा पाण्यात उडी घेतली. मात्र, ती बिचारी आई मुलासोबत स्वतःलाही वाचवू शकली नाही.

पाण्यात बुडून दोन्ही माय लेकाचा मृत्यू झाला. आई सोनाली घुले व मुलगा सोहम घुले या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या घटनेचे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स.पो.नि रंगनाथ जगताप, सपोनि पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस अंमलदार सुखदेव राठोड करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button