हिंगोली : भारत जोडो यात्रेत ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’चे नारे; आदित्य ठाकरेंचा सहभाग | पुढारी

हिंगोली : भारत जोडो यात्रेत 'पन्नास खोके, एकदम ओक्के'चे नारे; आदित्य ठाकरेंचा सहभाग

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेत युवासेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. ते खासदार राहुल गांधी यांच्या समवेत काही वेळ पदयात्रेत चालले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके, एकदम ओक्के ! अशी नारेबाजी केली.

राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेससोबत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असल्याने माजी पर्यावरणमंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे हे सहभागी झाले. भारत जोडो यात्रा चोरांबा फाटा येथे पोहोचली. त्यावेळी आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले. ते नागरिकांसोबत काहीवेळ चालल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत चालत त्यांनी राहुल गांधींशी चर्चाही केली. याचवेळी पन्नास खोके एकदम ओक्के! अशी घोषणाबाजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देत शिंदे गटाला पुन्हा डिवचले. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.

भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह दिसून आला. राहुल गांधी यांच्या या यात्रेत हमाल, मापाडी, पोतराज, आदिवासी, शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिम येथून मार्गक्रमण करेल. शुक्रवारी सायंकाळी भारत जोडो यात्रेचे हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले असून ही यात्रा पाच दिवस चालणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पदयात्रेस प्रारंभ होणार असून दुपारी साडेचार नंतर पुन्हा आराटी शिवारातून पदयात्रा सुरू होईल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कॉर्नर सभा होणार आहे. शनिवारी व रविवारी कळमनुरीत दोन मुक्‍काम राहणार आहेत. पुन्हा 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता उमरा फाटा येथून पदयात्रेस सुरूवात होणार आहे. हिंगोली येथे दुपारी साडेचार वाजता शिवलिला पॅलेस येथून पदयात्रा सुरू होऊन सायंकाळी साडेसात वाजता माळहिवरा येथे कॉर्नर सभा होईल. वडद फाटा येथे यात्रेचा मुक्‍काम राहणार असून 15 नोव्हेंबररोजी सकाळी साडेसहा वाजता पदयात्रेस प्रारंभ होऊन दुपारी यात्रा वाशिम जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे. वाशीम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button