करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू | पुढारी

करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या करुणा शर्मा यांना सोमवारी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील अन्य एक आरोपी असलेल्या अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयामध्ये वकील पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन सत्य जगासमोर आणण्याचा दावा करून काल दि. ५ रोजी परळीमध्ये दाखल झालेल्या करुणा शर्मा यांची काही महिलांसोबत बाचाबाची झाली.

त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याप्रमाणे करुणा शर्मा यांच्या गाडीची झडती घेतली असता एक पिस्तूल आढळून आले होते.

परळी शहर पोलीस ठाण्यात करूणा शर्मा यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आज (दि.६) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी असलेल्या अरुण मोरे यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, न्यायालयीन कामकाजात सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले तर करुणा शर्मा यांचे वकील न्यायालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतःच न्यायालयासमोर आपली बाजू मांडली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : खद खद मास्तर घडवताहेत हजारो अधिकारी । नितेश कराळे । MPSC । शिक्षक दिन विशेष

Back to top button