लातूर : किल्‍लारी कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका | पुढारी

लातूर : किल्‍लारी कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

लातूर;  पुढारी वृत्तसेवा : औसा विधानसभा मतदारसंघातील 124 ग्रामपंचायतींकडून आमदार अभिमन्यू पवार यांना किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी ठराव दिले होते. या ठरावाच्या अनुषंगाने आ. अभिमन्यू पवार यांनी 26 जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकर्‍यांची भूमिका त्यांच्यासमोर मांडली व किल्लारी साखर कारखाना लवकर सुरू करण्याबाबत विनंती केली असता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या बाबत सकारात्मकता दाखवली आहे. आमदारांच्या या प्रयत्नामुळे किल्लारी कारखाना सुरू होणेबाबात शेतकरी सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लातूर व धाराशिव जिल्ह्?यातील चार तालुक्याच्या 252 गावातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक समृद्धीच्या अनुषंगाने उभारण्यात
आलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना बंद असल्याने 22 हजार सभासदांचा ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गत काही वर्षापासून  किल्लारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेले आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर हा कारखाना सुरू करण्यासाठी आ. अभिमन्यू पवार हे सक्षम असल्याच्या अपेक्षेने औसा विधानसभा मतदारसंघातील 124 ग्रामपंचायतीकडून एका शिष्टमंडळाने 21 जुलै रोजी त्यांची भेट घेऊन संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव किल्लारी कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने दिले.

शेतकर्‍यांच्या या विश्वासापोटी आ. अभिमन्यू पवार यांनी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत 124 ग्रामपंचायतींनी कारखाना सुरू करण्याबाबत मंजूर केलेले ठराव त्यांच्याकडे सुपूर्द केले.व शेतकर्‍यांची किल्लारी कारखाना सुरू करण्याबाबत असलेली भूमिका मांडत हा कारखाना सुरू व्हावा ही विनंती केली.

आ. अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत यासंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन त्या बैठकीत योग्य निर्णय घेऊ असा शब्द दिला आहे.124 ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर लगेच याबाबत पाठपुराव्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून होत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  या भेटीदरम्यान भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेश कराड, उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री विनायकराव पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button