मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढविणार – रावसाहेब दानवे | पुढारी

मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढविणार - रावसाहेब दानवे

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या
रेल्वे स्थानकांना जोडून सर्वसामान्यांचा प्रवास कमी पैशामध्ये व आरामदायक होण्यासाठी मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. नांदेड ते पुणे या रेल्वेचा शुभारंभ जालना रेल्वे स्टेशन येथे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून नांदेड-पुणे ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. यापूर्वी आठवड्यातून दोन वेळेस केवळ हडपसरपर्यंत रेल्वेची सुविधा होती. हडपसर येथून पुणे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत होता. मराठवाड्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून जनतेसाठी सर्व सुविधांनीयुक्त व अत्यंत सोयीची ही दैनंदिन रेल्वे सुरू करण्यात आली आहे. दररोज ही रेल्वे नांदेड ते पुणे दरम्यान धावणार असून सायंकाळी 7.05 वाजता ही रेल्वे जालना स्थानकातून निघून दुसर्‍या दिवशी पहाटे 5.30 वाजता ही रेल्वे पुणे येथे पोहोचणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले

Back to top button