औरंगाबाद : भरधाव कंटनेरने दोन दुचाकींना उडवले ; तरुण जागीच ठार | पुढारी

औरंगाबाद : भरधाव कंटनेरने दोन दुचाकींना उडवले ; तरुण जागीच ठार

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक देत फरफटत नेले. या भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) गावाजवळील  तलावासमोर रविवारी रात्री घडली. नेमिनाथ पंडितराव हांडे (वय ३५) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  आकाश भगवान घुले वय (३२) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंतरवाली खांडी (ता.पैठण) येथील नेमिनाथ हांडे आणि आकाश घुले हे वेगवेगळ्या  दुचाकीवरून कचनेर फाट्यावरुन आपल्या गावी येत होते. यावेळी आडगाव जावळे शिवारातील तलावाजवळ त्यांच्या दुचाकींना औरंगाबादकडे राँग साईडने जाणाऱ्या भरधाव मालवाहू कंटेनरने (क्रमांक आरजी ०६जीजी ४४०१)  समोरुन जोराची धडक देली. या भीषण अपघातात नेमिनाथ हांडे हा कंटेनरच्या चाकाखाली सापडून चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश घुले हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन  पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

अपघाताचे दृश्य बघताच चालकाला आली भोवळ

या अपघातानंतर औरंगाबादहून राजस्थानकडे निघालेल्या कंटेनर चालकाला अपघाताचे दृश्य बघताच भोवळ आली. क्लिनरने कसाबसा कंटनेर एका धाब्यावर आणून थांबविला. त्या चालकाला खासगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले.

कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर

नेमिनाथ  हांडे याचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  हांडे पेट्रोल पंपावर कामाला होता. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने त्याच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button