नांदेड : कारभार संगणकीकृत करण्यास ग्रामपंचायतींची उदासीनता | पुढारी

नांदेड : कारभार संगणकीकृत करण्यास ग्रामपंचायतींची उदासीनता

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतींचे कामकाज पारदर्शक व्हावे,लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी पार पाडावी ,शासकीय योजनांची माहिती जनतेला सहजरित्या मिळावी या उद्देशाने ग्रामपंचायत संगणकीकृत करण्यात आली, तसेच 45 ग्रामपंचायतींचे कामकाज पाहण्यासाठी 20 ऑपरेटर नियुक्त करण्यात आले. तरीही संगणकीय कामकाजातून सुटका करून घेत सोयीस्करपणे कागदी कामकाजावरच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती भर देत असल्याने नेमकी एवढी उदासीनता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रत्येक योजनेचा निधी वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट ग्रामपंचायतीस येत आहे तसेच विविध प्रकारच्या योजनांची मंजुरी देणे व देयके अदा करण्याचे अधिकार थेट ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आले. त्यामुळे इतर कार्यालयात मारावे लागणारे खेटे कमी झाले.
गावाचा कोणत्या योजनेत समावेश आहे, गावपातळीवर लाभार्थी निवडीचे निकष कोणते, त्या योजनेचा लाभ किती जणांना घेता येतो तसेच
एकूण निधी किती याबद्दलची परिपूर्ण माहिती प्रत्येक गावाच्या दर्शनी भागावर लावणे व त्याकरिता आलेले प्रस्ताव सांगणकीकृत करून आवश्यक त्या बाबीची पूर्तता केल्यावर वरिष्ठ कार्यालयाकडे संचिका अहवाल सादर करण्याचे काम ग्रामपंचायतीचे असते.

परंतु, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी संगणकीय कामकाजास बगल देत कागदोपत्री फाईल बनवून तालुकास्तरावर म्हणजेच पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी व कारभार पारर्दशक ठेवण्यासाठी संगणकीय कामकाजावर भर देणे अनिवार्य असतानाही उपरोक्त प्रकरणी जाणीवपूर्वक या कार्यास बगल दिली जात आहे.

धर्माबाद तालुक्यातील एकूण 52 गावे असून 45 ग्रामपंचायती आहेत प्रत्येकी 2 किंवा 3 ग्रामपंचायत करिता एक ऑपरेटर नियुक्त करण्यात आला अपवाद वगळता अनेक ठिकाणची कामे अतिशय सोयीनुसार केली जात आहेत. नागरिकांना कोणत्या कामासाठी किती शुल्क द्यावे लागते. याचा फलक देखील लावण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. ग्रामपंचायतीच्या कामाकरिता नियुक्त ऑपरेटरकडून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभाचा व्यक्तीगत व्यवसाय करण्यासाठी निर्बंध
असूनही या नियमांची जाणीवपूर्वक पायमल्ली होत असून ग्रामसेवक देखील यावर गप्पच राहत असल्याने गटविकास अधिकारी कार्यालयाने  अचानकभेटी देऊन वास्तविकता तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. विविध ग्रामपंचायतीच्या ठिकाणी
असलेल्या बायोमॅट्रिक मशीन बंद अवस्थेत असून त्या खरोखरच तांत्रिक कारणाने बंद आहेत की जाणीवपूर्वक बंद ठेवल्या जातात याची कारणमीमांसा होणेही गरजेचे बनले आहे.

ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन व संगणकीकृत होणे गरजेचे आहे. यासाठीच शासनाच्या वतीने कॉम्प्युटर देण्यात आले व ऑपरेटर नियुक्त करण्यात आले. मी नव्यानेच तालुक्याचा पदभार घेतला असून याबाबत प्रत्यक्षात शहानिशा करू व ज्या ठिकाणी उपरोक्त नियमांची अंमलबजावणी केली जात नाही, त्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल.
– राजेंद्रप्रसाद बजाज,
गटविकास अधिकारी, धर्माबाद

Back to top button