लोमाशिया टास्मानिका ही तब्बल 43 हजार वर्षांपासून असलेली वनस्पती | पुढारी

लोमाशिया टास्मानिका ही तब्बल 43 हजार वर्षांपासून असलेली वनस्पती

लंडन : ‘लोमाशिया टास्मानिका’ ही पृथ्वीवरील सर्वात जुनी वनस्पती आहे. ही वनस्पती सुमारे 43,600 वर्षांपासून पृथ्वीवरील आपले अस्तित्व टिकवून आहे.

या वनस्पतीला गुलाबी रंगाची छोटी, नाजूक फुले येतात. मात्र, त्याला फळ लागत नाही. झाडाची वाढही अतिशय सावकाशपणे होते. थोडेसे मोठे झालेल्या झाडाची एखादी फांदी तुटून खाली पडली की ती त्याच ठिकाणी रुजते व नवे झाड येते. अशाप्रकारे एकाच ठिकाणी हजारो वर्षांपासून अस्तित्व राखून ठेवलेली ही वनस्पती आहे.

सध्या अशा प्रकारची केवळ तीनशे झाडे पृथ्वीतलावर आहेत व तीही एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे कालांतराने ती नामशेष होऊन जाईल अशी भीती आहे. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. 1934 मध्ये या वनस्पतीची संशोधकांना ओळख झाली.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डेनिसन किंग नावाचा एक खाण कामगार बाथरस्टच्या डोंगर पायथ्याला खणण्याचे काम करीत असताना त्याला हे वेगळ्या प्रकारचे झाड दिसले. इतरत्र कुठेच न दिसणारी अशी झाडे एकाच ठिकाणी दाटीवाटीने वाढली होती.

किंग स्वतः निसर्ग अभ्यासक असल्याने ही वनस्पती लोमाशिया प्रजातीमधील असल्याचे त्याच्या लक्षात आले. लोमाशियातील हा नवाच प्रकार असावा किंवा ही अतिशय जुनी वनस्पती असावी हे मात्र त्यावेळी त्याच्या लक्षात आले नाही.

विनिफ्रेद कर्टीस यांनी कालांतराने या वनस्पतीचा अभ्यास करून तिला ‘लोमाशिया टास्मानिका’ हे नाव दिले. या झाडाच्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यावर ते 43,600 वर्षे जुने असल्याचे निष्पन्न झाले. अर्थात प्रत्येक स्वतंत्र झाडाचे आयुष्य हे तीनशे वर्षे असते.

Back to top button