

कृष्णा, वारणा नदीकाठचा महापूर ओसरला पण 'कोरोना'चा संसर्ग मात्र ओसरेना झाला आहे. कोरोना संसर्गाचे शेपूट लांबतच चालले आहे. 'कोरोना'बाबत प्रशासन आणि लोकांमध्ये आलेली ढिलाई त्याला प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे चित्र दिसत आहे. गर्दी हटेना झाली आहे. मास्क व सोशल डिस्टंन्सिंगबाबत बेफिकिरी वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट सुरू होते की काय, अशी भीतीही व्यक्त होताना दिसत आहे.
'कोरोना'ने डोके वर काढल्यापासून साधारणतः 90 ते 120 दिवसांत रुग्णसंख्या नियंत्रणात येते, असे म्हटले जाते. जिल्ह्यात दुसर्या लाटेत मार्च, एप्रिल 2021 पासून कोरोनाने डोके वर काढले. फेब्रुवारी 2021 मध्ये नवीन रुग्ण संख्या 403 इतकी होती. मार्चमध्ये रुग्णसंख्येत 3 हजार 204 ने भर पडली. एप्रिलमध्ये तर नवीन संख्या 24 हजाराने वाढली.
मे महिन्यामध्ये तर 42 हजार 689, जूनमध्ये 27 हजार 539, जुलैमध्ये 29 हजार 65 अशी रुग्ण संख्येत भर पडत गेली.90 ते 120 दिवसांचा कालावधी संपूनही रुग्ण संख्या नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण संख्या सांगली जिल्ह्यातच आढळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर जिल्ह्यांचा संसर्ग केव्हाच कमी झाला आहे. या व अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील संसर्ग मात्र लांबतच चालला आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिला दिवस तसा थोडासा दिलासा देऊन गेला. कारण या दिवशी नवीन रुग्णसंख्या 589 होती. रुग्णसंख्या आठशेवरून पाचशेच्या घरात आली. त्यामुळे जरा बरे वाटले, पण पुन्हा दि. 2 ऑगस्टरोजी 913 व दि. 3 ऑगस्टरोजी 862 इतके नवे रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्ण संख्या अजूनही 800 ते 900 यादरम्यानच राहिली आहे.
रुग्ण संख्येत अजूनही अपेक्षित घट होताना दिसत नाही, त्यामुळे 'कोरोना'ची चिंता कायम आहे. मे 2021 या महिन्यात मृत्यू संख्या 1 हजार 158 होती. जूनमध्ये ती 649 आणि जुलैमध्ये 548 इतकी आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून व जुलैमध्ये मृत्यूसंख्या घटली आहे. तेवढाच एक दिलासा आहे.
तरीही मृत्यू संख्येचा सध्याचा आकडाही जादाच आहे. मृत्यू रोखता येईनात ही वस्तुस्थिती आहे. रोज पंधरा वीस रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मृत्यू होत आहेत आणि संसर्गही आटोक्यात येईना, ही वस्तुस्थिती आहे.
जुलैच्या मध्यानंतर कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अजूनही तशी चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे रुग्णसंख्या कमी होईना आणि दुसरीकडे गर्दीही हटेना आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझरचा वापर याबाबी महत्त्वाच्या आहेत, पण त्याबाबत ढिलाई दिसत आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियम पाळले जाताना दिसत नाहीत. मास्कचा वापरही प्रभावीपणे होताना दिसत नाही. निर्बंध डावलून व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे. या सार्याचा परिणाम म्हणून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास अजून किती दिवस लागणार, याचा अंदाज जाणकारांना येईना झाला आहे.
दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट येते की काय, अशी साधारण भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लोकांनीच अधिक स्वयंशिस्त पाळणे आवश्यकआहे.
51 टक्के मृत्यू तीन महिन्यांत
जिल्ह्यात पहिल्या व दुसर्या लाटेत दि. 31 जुलैअखेर 4 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 2 हजार 355 मृत्यू हे मे, जून आणि जुलै 2021 या तीन महिन्यांत झाले आहेत. एकूण मृत्यू संख्येशी हे प्रमाण 50.96 टक्के इतके आहे. मे 2021 मध्ये 1 हजार 158, जूनमध्ये 649 आणि जुलै 2021 मध्ये 548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लसीचा तुटवडा हेही मोठे दुखणे
कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडाही कायम आहे. 18 ते 44 वयोगटातील केवळ 13 टक्के व्यक्तींना कोरोनाचा पहिला डोस मिळाला आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींचे हे प्रमाण 63 टक्के आहे. जिल्ह्यात 8 लाख 25 हजार 519 व्यक्तींना पहिला डोस मिळाला आहे. तर 3 लाख 85 हजार 788 व्यक्तींना दुसरा डोस मिळाला आहे. लसीपासून वंचित व्यक्तींची संख्या मोठी आहे. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांचे तातडीने लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लसी मिळत नाहीत, हेच मोठे दुखणे आहे.
कोरोना संदर्भातील वर्तनात लोकांमध्ये प्रचंड ढिलाई आली आहे. त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग हेच कोरोनापासून वाचवू शकते, पण मास्क अनेकांच्या गळ्यात अथवा हनुवटीवर दिसतो. सोशल डिस्टंन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. लग्न, समारंभ तसेच घरगुती अन्य कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्तीने बंधने आणली पाहिजेत.
– डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक