परभणीत 61 हजाराचा गांजा जप्त, दोघांना अटक | पुढारी

परभणीत 61 हजाराचा गांजा जप्त, दोघांना अटक

परभणी, पुढारी वृत्तसेवा : नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शाहू नगरात गांजा बाळगणार्‍या दोघा जणांना पोलिसांच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून 61 हजार 500 रूपयांचा गांजा व दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून नानलपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाचे फौजदार विश्‍वास खोले यांना छत्रपती शाहू नगरात दोन युवकांकडे गांजा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे फौजदार खोले यांच्यासह नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन वाघमारे, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर तसेच पोलिस कर्मचारी अकबर पठाण, भारत नलावडे, जावेद खान, सुनिल राठोड,  रामकिशन काळे, सय्यद जाकेर, अरूण कांबळे, हवालदार लक्ष्मण कांबळे आदींनी एका घरावर छापा मारला.

त्यावेळी तेथे 6 किलोग्रॅम गांजा आढळून आला. याच भागातील राहूल ढवळे आणि नामदेव अवचार यांच्या राहत्या घरात त्यांनी हा गांजा विक्रीसाठी बाळगला होता. त्यावरून त्यांना अटक करून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button